सातारा : राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि त्यांची समाधी असलेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते कार्तिक कृष्ण चतुर्थी म्हणजेच शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 ते मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 या कालावधीत अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त श्रीविष्णू पंचायतन याग याचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात अनेक थोर वैदिक, संत, विद्वान आणि धार्मिक परंपरेतील अध्यात्मिक पिठांचे परमपूज्य पीठाधीश यांच्या पावन उपस्थितीचा लाभ होणार आहे. त्यांच्याद्वारे श्री समर्थ सेवा मंडळास आणि सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या सर्व सदभक्त साधकांना त्यांच्या प्रसन्न दर्शनासह विविध उदात्त विषयावरील बहुमोल उद्बोधन व मार्गदर्शनपर व्याख्याने प्राप्त होणार आहेत. यात सदहेतूने प्रेरित होऊन श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अशा या दुर्लभ सोहळ्याचे आयोजन आयोजित करण्यात आला आहे .या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सज्जनगड येथे मान्यवर, महंत तसेच धार्मिक क्षेत्रातील महान व्यक्तींचे आगमन होण्यास प्रारंभ झाला आहे.
श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे पिण्याच्या पाण्याचा तलावाजवळ उभारण्यात आलेल्या श्री अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे काम अंतिम टप्प्यात आले असून अतिशय देखण्या अशा या मंदिर प्रांगणात हा सर्व सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान गुरुवारी समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते तसेच मान्यवर ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत या प्रतिकृती असलेल्या मंदिर मंडपाचे स्थलशुद्धी जलशुद्धीकरण मंत्र उपचाराने करण्यात आली.
सुप्रसिद्ध निरूपणकार आणि प्रवचनकार श्रीमती मंदाकिनीताई गंधे यांचे सज्जनगडावर आगमन झाले आहे. सज्जनगड येथील भातखळे येथे असलेल्या एसटी बस स्थानक आणि पायऱ्यांच्या प्रारंभी उभारण्यात आलेली ऐतिहासिक बुरुजाची भव्य कमान मंडप ही लक्षवेधक असून या कमानीचे दोन्ही बाजूला असलेल्या जय-विजय यांच्या प्रतिकृती या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. सज्जनगडावरील यज्ञशाळेत विष्णू पंचायतन यागाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून देशातील अनेक मान्यवर ब्रह्म बंधनांच्या हस्ते हा यज्ञ 19 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या महासोहळ्याचा प्रारंभ शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता वेदमूर्ती याज्ञिकांचे हस्ते जप अनुष्ठानाच्या प्रारंभाने होणार आहे. त्यानंतर सकाळी आठ वाजता पंचायतन देवता व ग्रंथांची शोभायात्रा सर्व उपस्थित भक्त सहभागातून सज्जनगड येथे निघणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत सज्जनगड येथे उभारण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त च्या श्रीराम मंदिर अयोध्येचे प्रतिकृती रूप असलेल्या भव्यसभा मंडपात वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांचा शुभ प्रवेश होणार असून त्यानंतर सभामंडपात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन शांती मंत्रांचे पठण आणि आशीर्वचन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत परमपूज्य परम श्रद्धेय मंदाकिनीताई गंधे यांचे प्रवचन होणार असून दुपारी चार ते सहा या वेळेत पुणे येथील समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.रात्री 9 वाजता नरसोबाची वाडी येथील पंडित कृष्णेन्द्र वाडीकर यांची गायन सेवा संपन्न होणार आहे .या सर्व सोहळ्यास समस्त समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.