कथांमधून उलगडले समाजवास्तवतेचे दर्शन; उस्फूर्त प्रतिसादाने कथाकथनाचा सोहळा खऱ्या अर्थाने रंगला

by Team Satara Today | published on : 03 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत (सातारा) : ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस कथांच्या उत्कट सादरीकरणाने उजळून निघाला. दैनंदिन जीवनातील साधे प्रसंग, मानवी स्वभावाचे पैलू आणि बदलत्या समाजवास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या कथांनी सातारकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाने कथाकथनाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने रंगला.

व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह विनोद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन गुरव यांनी केले. शब्दांच्या या मैफिलीने साहित्यातील 'कथा' हा प्रकार आजही तितकाच जिवंत आणि प्रभावी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

ग्रामीण बाज आणि प्रवासाचे अनुभव..

कार्यक्रमाची सुरुवात राजेंद्र गहाळ यांनी 'लगीन पटका' या कथेने केली. ग्रामीण संस्कृती, लग्नसराईतील गडबड आणि सर्वसामान्य कुटुंबातील मानसिकता त्यांनी इतक्या सोप्या भाषेत मांडली की, श्रोते त्या कथेशी एकरूप झाले.

त्यानंतर, 'श्वास' चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे यांनी 'रेल्वे प्रवास' ही कथा मांडली. स्वतःच्या अनुभवावर आधारित या कथेतून त्यांनी रेल्वेतील सहप्रवासी, त्यांचे मुखवटे आणि अडचणीच्या वेळी दिसणारे खरे चेहरे यांचे मार्मिक चित्रण केले.

अभिनयाची जोड आणि वास्तव दर्शन..

बाबा परीट यांनी 'शिकार' ही व्यक्तीसापेक्ष कथा सादर केली. त्यांच्या सादरीकरणातील आवाजातील चढ-उतार आणि सहज अभिनयामुळे साधी वाटणारी कथाही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली. तर, प्रा. रवींद्र कोकरे यांनी 'पंचनामा' या कथेद्वारे आजच्या सद्यस्थितीवर आणि सामाजिक वास्तवावर भाष्य केले. त्यांच्या टोकदार मांडणीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

स्त्री मनाचा कोपरा..

कार्यक्रमाचा समारोप कल्पना देशपांडे यांच्या 'त्या दरवाजा आड' या कथेने झाला. स्त्री जीवनातील गुंतागुंत, भावनिक वलये आणि बंद दरवाजाआड दडलेले त्यांचे भावविश्व त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने उलगडले. पाच कथाकारांनी आपल्या शैलीदार सादरीकरणाने साहित्यप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरले.  संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते प्रा. मोहन गुरव आणि कथाकथनकार यांचा सन्मान करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सांगा आम्ही काय गुन्हा केला? आम्हाला अजूनही संविधानाच्या बाहेर का ठेवलेले आहे?: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड, ज्येष्ठ लेखक-प्रकाशकांचा साहित्य संमेलनात सत्कार
पुढील बातमी
रहस्यकथा, भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा; साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका

संबंधित बातम्या