सातारा : मंगळवार पेठ, मोरे कॉलनी येथे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करून पिस्तुल, काडतुसासह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतुस, रोख रक्कम असा 87 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अक्षय सुतार वय 26, रा. मोरे कॉलनी, सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संबंधित संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये 20 मार्च रोजी आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना याबाबत तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला. मंगळवार पेठ सातारा येथील गुन्ह्यातील घटनास्थळावरून पोलीस माहिती घेत असताना खबरीमार्फत पोलिसांना संबंधित इसम मंगळवार पेठ, मोरे कॉलनी येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी त्या परिसरात जाऊन सुतार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.
त्याच्याकडून 75 हजार रुपये किंमतीचे पिस्टल, पाचशे रुपये किंमतीचे जिवंत काडतुस व बारा हजार रुपये रोख असा 87 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे तसेच सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रशांत मोरे यांनी या तपासात सहभाग घेतला होता.