बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नववर्षात चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. नव्या वर्षात खिलाडी कुमार साऊथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. 'कन्नप्पा' या सिनेमातून अक्षय टॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. त्याच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
'कन्नप्पा' या अक्षय कुमारच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर या सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'कन्नप्पा' सिनेमात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या पोस्टरवर अभिनेत्याचा भगवान शंकराच्या लूकमधील अवतार दिसत आहे. यामध्ये त्याने त्याने धोतर नेसल्याचं दिसत आहे. एका हातात त्रिशूल आणि दुसऱ्या हातात डमरू असा रौद्र अवतार पाहायला मिळत आहे. निळकंठ जटाधारी भगवान शंकराचं विलोभनीय रूप दिसत आहे.
'कन्नप्पा' सिनेमाच्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमात काजल अग्रवाल पार्वती देवीची भूमिका साकारणार आहे. तर प्रभास नंदीच्या भूमिकेत दिसणार आहे. साऊथ सुपरस्टार मोहनलाल या सिनेमात कॅमिओ करणार आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.