सातारा : चंदननगर- कोडोली (ता. सातारा) येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी व गणेश मंदिराच्या कलशारोहण समारंभ निमित्ताने येत्या रविवारी (दि. 20) विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या विषयी करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
रविवार, दि. 20 रोजी दुपारी 12 वाजून 26 मिनिटांनी कलशारोहणाचा मुख्य विधी होईल. सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामी मठातील महंत सोन्नाबुवा रामदासी महाराज, महंत अभिजीतबुवा काकडे महाराज यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आ. महेश शिंदे, माजी मंत्री व विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंदिराच्या कलशारोहणानिमित्ताने रविवारी पहाटे 5 ते 6:30 या वेळेत काकड आरती, त्यानंतर 8:30 ते 10:30 या वेळेत कलशाची गावातून मिरवणूक, त्यानंतर दुपारी 12:15 वाजेपर्यंत होम हवन कलश पूजन व पूजा विधी, त्यानंतर मुख्य कलशारोहण समारंभ, दरम्यान दुपारी 1 ते 5:30 या कालावधीत अखंडितरित्या भजन व हरिपाठ, सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत ह. भ. प. महेश शेलार महाराज (आखाडे - हुमगाव) सुश्राव्य कीर्तन त्यानंतर सायंकाळी 7:30 ते 11 या वेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. तसेच त्यादरम्यान धनंजय जाधव आणि सहकाऱ्यांचा "गंधार कराओके" हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम संपन्न होईल.
या सर्व कार्यक्रमांत सहभागी होण्याचे व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी व गणेश मंदिर समिती आणि चंदन नगर ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.