सातारा : मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून संस्कृतीची, अस्मितेची आणि ज्ञानसंपदेची शिदोरी आहे. आजच्या पिढीने तंत्रज्ञानाचा वापर करून मराठीला जागतिक पातळीवर पोहोचवावे, मराठी भाषेचे जतन, संवर्धन ही प्रत्येका नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांनी केले. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, साहित्यिक परंपरा आणि आधुनिक काळातील आव्हाने यांचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी व मावळा फाउंडेशन सातारा आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मराठी भाषा अभिजात दर्जा सप्ताह चा प्रारंभ यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथे सोमवारी मोठ्या उत्साहात आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून डॉ. माने बोलत होते. यावेळी मराठी भाषेच्या अभिजात परंपरेचा गौरव साजरा करताना या कार्यक्रमाने परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि साहित्य रसिकांना नव्या प्रेरणा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सभागृहात मराठी भाषेचा इतिहास, साहित्यिक वारसा आणि आधुनिक काळातील योगदान यावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवरील घोषवाक्ये आणि अभंगांच्या ओव्या गाऊन उपस्थितांना भारावून टाकले. यशोदा कुटुंब प्रमुख प्रा. दशरथ सगरे यांनी मराठी भाषा आणि शिक्षणाच्या नात्यावर भाष्य करताना विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून विचार मांडण्याचे धाडस दाखवले पाहिजे. मातृभाषेतील शिक्षण आणि संशोधन समाजाच्या प्रगतीसाठी भक्कम पाया घालते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची प्रतिष्ठा जपण्यासाठी युवा पिढीने लेखन, वाचन आणि नव्या साहित्य निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. त्यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्य महामंडळ, साहित्य परिषद आणि शैक्षणिक संस्थांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी विजयकुमार लांडगे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, तुषार महामुलकर, आर. डी. पाटील, सचिन सावंत, गणेश सुरवसे, रणधीर सिंह मोहिते, डॉ. विक्रम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवरील कविता, वाचनस्पर्धा व नाट्य प्रयोग सादर करून मराठीच्या समृध्द साहित्यिक परंपरेची झलक दाखवली. विशेषत: यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय होता. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन करताना आयोजकांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठी अशीच शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांची मालिका राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. मराठी भाषेचा अभिजात दर्जा कायम राखणे आणि नव्या पिढीला भाषेच्या गौरवशाली परंपरेशी जोडणे, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम, साहित्याची जाण आणि सांस्कृतिक जाणीव दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.