सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केलेली अन्यायकारक एसटी प्रवासी भाडेदरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीने एका निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हा महिला आघाडीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी याबाबत एसटी महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांना एक निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की एसटीची सेवा ही सर्वसामान्यांना परवडणारी आणि दिलास देणारी आहे. मात्र, आता महामंडळाने केलेल्या प्रवासी दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जाणार आहे.
एका बाजूला राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवून महिलांना लाभ देण्याचा देखावा करते आहे, तर दुसऱ्या बाजूने एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ करून सामान्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करत आहे. असे दुटप्पी धोरण सरकारने तातडीने थांबविले पाहिजे.
एसटीच्या प्रवास भाड्यात वाढ झाल्याने लाडक्या बहिणींच्या पतींचा, मुलांचा प्रवासाचा खर्च वाढला आहे. सामान्य जनतेला जाचक असणारी ही एसटी प्रवास भाड्याची वाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा राज्य सरकार विरोधात राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
निवेदनावर पक्षाच्या महिला आघाडीच्या पश्चिम अध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, सातारा जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, सातारा तालुकाध्यक्षा मेघा नलावडे, सातारा शहराध्यक्षा तेजस्विनी केसरकर, जिल्हा चिटणीस शैलजा कदम, जिल्हा सरचिटणीस वैशाली जाधव, जिल्हा सचिव सौ. अमृता घार्गे, जिल्हा उपाध्यक्षा नलिनी जाधव, माण तालुकाध्यक्ष मंदाकिनी सावंत आदींच्या सह्या आहेत.