सातारा : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे .राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्रदान केले. कार्यकर्त्यांची जिल्ह्यामध्ये विस्कळीत झालेले घडी सुसूत्र पद्धतीने बांधून त्यांना ऊर्जा देण्याचे मोठे आव्हान बाळासाहेब पाटील यांना पेलावे लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या बांधणीमध्ये तसेच एकंदर वाटचालीमध्ये माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मोठे योगदान राहिले आहे .तब्बल आमदार राहिलेल्या बाळासाहेब पाटील यांची कराड उत्तरची राजकीय पकड 2016 मध्ये कमी पडून तेथे भाजपचे आमदार मनोज घोरपडे निवडून आले.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर बरेचसे राजकीय बळ अजितदादा गटामध्ये गेल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाताहात झाली. आमदार शशिकांत शिंदे व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे दोनच सच्चे निष्ठावंत शरद पवार यांच्यासोबत राहिले. सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरपालिका निवडणुका या राष्ट्रवादीला कोणत्याही जिल्हा कार्यकारणीशिवाय पार पाडाव्या लागल्या.
राष्ट्रवादीला सक्षम जिल्हाध्यक्ष पदाची गरज होती त्या दृष्टीने आमदार बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यकर्त्यांची मोट बांधणे राष्ट्रवादी गट आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने सुदृढ करून भारतीय जनता पार्टीला एक मोठे आव्हान निर्माण करणे हे बाळासाहेब पाटील यांच्यापुढे आव्हान असणार आहे. बाळासाहेब पाटील यांच्या निवडीबद्दल पाटील यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे.