माळशिरस : म्हसवड-पंढरपूर मार्गावर मळोली तांदुळवाडी (ता. माळशिरस) गावच्या हद्दीत रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. रस्त्यालगत असलेल्या एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पिकअप गाडी कोसळून झालेल्या या अपघातात एकाच गावातील व एकाच कुटुंबातील तब्बल आठ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातातून पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा आणि सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असलेले हे सर्व भाविक रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी आले होते. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदाने आपल्या गावी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. गेल्या दोन वर्षांपूर्वीच नूतनीकरण झालेल्या या पंढरपूर-सातारा रस्त्यावर वाहनांचा वेग प्रचंड वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज दुपारी तांदुळवाडी परिसराजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही पिकअप थेट रस्त्याशेजारील विहिरीत कोसळली. विहीर पाण्याने पूर्णपणे गच्च भरलेली असल्याने गाडीतील प्रवाशांना जीव वाचवण्याची पुरेशी संधीही मिळाली नाही आणि क्षणात सर्व काही संपले.
अपघाताचा भीषण आवाज होताच तांदुळवाडी गावातील आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या इरफान मुजावर, स्वप्नील कदम, किरण दुधाट, तुकाराम कर्णवर, धायगुडे, दादा माने, हेगडे ड्रायव्हर, हणमंत रणदिवे, सौरभ कोळी, हनुमंत रंधवे आणि धनाजी कदम या स्थानिक तरुणांनी आणि नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून बचावकार्य सुरू केले. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या प्रयत्नांमुळे गाडीतील पाच जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मात्र, दुर्दैवाने आठ जणांना वाचवता आले नाही.
या भीषण अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६०), पूजा अमोल सातोरे (वय २३), पूजा बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), आरव अमोल सातोरे (वय ८) आणि अवघ्या ६ महिन्यांचा चिमुरडा समर्थ बालाजी बावचे या आठ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील आठ जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
दरम्यान, या अपघाताच्या निमिताने सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे (कम्पाऊंड) नव्हते, तसेच वाहनचालकांना सतर्क करणारा कोणताही दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नव्हता, अशी तीव्र संतापजनक माहिती प्रत्यक्षदर्शांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची त्रिस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून जिल्ह्यातील रस्त्यालगत असलेल्या सर्व विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना मजबूत संरक्षण कठडे उभारण्याच्या कडक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.