चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरसह संशयित पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 25 August 2025


म्हसवड : हिंगणी (ता. माण) येथील राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्याने आठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर अवघ्या पाच तासांच्या अवधीतच ट्रॅक्टरसह संबंधित संशयितास शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) या संशयितास ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिल विष्णू माने (रा. हिंगणी, ता. माण) यांचा ट्रॅक्टर (एमएच ११ सीडब्ल्यू ३९८५) त्यांच्या राहत्या घराजवळून अज्ञाताने चोरून नेला होता. त्यानंतर अनिल माने यांनी शोध घेतल्यानंतरही ट्रॅक्टर न सापडल्याने त्यांनी म्हसवड पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आठ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे हा गुन्हा संशयित धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) याने केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर संबंधित संशयिताला पकडण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच तासांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत धनाजी याच्याकडून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील चिक्कूच्या बागेत लपविलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला.

या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलिस कर्मचारी शहाजी वाघमारे, अमर नारनवर, मैना हांगे, वसीम मुलाणी, विकास ओंबासे, संतोष काळे आदींनी सहभाग घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला
पुढील बातमी
सुरवडी येथे 2 तोळ्यांचा ऐवज लंपास

संबंधित बातम्या