सातारा : बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप व इतर रेजिमेंट कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक, विरपिता, वीरमाता, वीरपत्नी,माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान रेकॉर्ड ऑफिस, बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप यांचे मार्फत २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महासैनिक भवन, टी सी पी सी परिसर, करंजे नाका, सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक कल्याणकारी योजना कौशल्य विकास योजना याबाबत माहिती तसेच माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक अडी अडचणी, प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मेडिकल व डेंटल कॅम्पची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सर्व माजी सैनिक (३५-४५ वयोगटातील) व अवलंबितांना कौशल्य विकास व प्रशिक्षणबाबतची माहिती कौशल्य विकास अधिकारी देणार आहेत.
भारतीय सैन्यदल, नौसेना व वायुसेना मधून निवृत्त सर्व माजी सैनिक व संबंधित लाभार्थीनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्याचे निराकरण करावे व कौशल्य विकासाबाबत माहिती घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी साधावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे यांनी केले आहे.