साताऱ्यात आंबेडकर जयंतीचा जल्लोष; डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई

by Team Satara Today | published on : 13 April 2026


सातारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात विविध कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले असून सर्वत्र उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. शाहू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आल्याने परिसर उजळून निघाला आहे.

मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता यशवंत उद्यान येथे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर व इतर सभापती उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे, यशवंत उद्यानात नव्याने उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी ५ वाजता मुख्य जयंती सोहळ्याचे उद्घाटन होणार असून नगरपालिकेच्या वतीने विशेष चित्ररचना सादर केली जाणार आहे. संविधानाची प्रतिकृती तसेच चवदार तळे संग्रामाचा देखावा उभारून बाबासाहेबांच्या कार्याची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या उत्सवातील भव्य मिरवणूक हे विशेष आकर्षण ठरणार असून त्यामध्ये कोल्हापूरचे पारंपरिक हलगी वादक, साताऱ्यातील बॅन्जो पथक तसेच उंट-घोड्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मिरवणुकीत पारंपरिकतेसह जल्लोषाचे वातावरण निर्माण होणार आहे.

सातारा नगरपरिषद आणि संयुक्त जयंती समारोह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती उत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्तात्रय बनकर व सभापती संकेत साठे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरपालिकेचा पाणी कपातीचा निर्णय; १५ एप्रिलपासून पाणीपुरवठ्यात कपात; आठवड्यातून एक दिवस बंद
पुढील बातमी
सहकार प्रशिक्षण सभागृहाचे साताऱ्यात 20 एप्रिल रोजी लोकार्पण; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

संबंधित बातम्या