पुसेगाव : ऐतिहासिक वर्धनगड किल्ल्याच्या तटबंदीचा सुमारे १० टनाहून अधिक वजनाचा महाकाय दगड बुधवारी रात्री अचानक सुटून खालील लोकवस्तीत कोसळला. सुदैवाने हा दगड दोन घरांच्या मध्यभागी थांबल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बुधवारी २४ जून रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. किल्ला परिसरातील लोकवस्ती गाढ झोपेत असताना अचानक तटबंदीच्या खालच्या बाजूचा एक अवाढव्य दगड निसटून खाली आला. दगड गडगडत येण्याचा आवाज इतका भयानक होता की, परिसरातील नागरिक तात्काळ जागे झाले. मात्र, रात्रीच्या काळोखामुळे नेमके काय घडले हे कोणालाच समजले नाही. गुरुवारी सकाळी उजाडल्यानंतर वस्तीतील दोन घरांच्या अगदी मधोमध हा विशाल दगड येऊन थांबल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती या प्रचितीनुसार हा दगड घरांवर न आदळल्यामुळे दोन्ही कुटुंबांतील नागरिक बालंबाल वाचले. हा दगड जर थेट घरांवर कोसळला असता तर क्षणार्धात घरांचा चुराडा होऊन मोठी दुर्घटना घडली असती.
किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीवर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली असून, त्यामुळे तटबंदी दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. याच कारणामुळे हे महाकाय दगड सुटत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यापूर्वीही तटबंदीवरील झाडेझुडपे काढण्यासंदर्भात अनेकदा वृत्तपत्रांमधून मागण्या करण्यात आल्या होत्या, मात्र वनविभागाने आजतागायत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच आरपीआयचे अध्यक्ष प्रशांत शिवशरण यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. त्यानंतर वनपाल काशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व या गंभीर परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला असल्याची माहिती दिली.
सध्या वातावरणात वेगाने बदल होत असून कधी तीव्र ऊन तर कधी मुसळधार पाऊस पडत आहे. अशा बदलत्या हवामानामुळे आगामी काळात किल्ल्यावरील इतरही धोकादायक दगड खाली येण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या धोकादायक मोठ मोठ्या दगडांची त्वरित विल्हेवाट लावावी आणि ऐतिहासिक तटबंदीवरील झाडेझुडपे तात्काळ काढून तिचे जतन करावे, अशी आग्रही मागणी आता वर्धनगड परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.