सातारा : कोणतेही तारण न घेता 3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका बांधकाम व्यावसायिकाकडून 6 लाख 36 हजार 800 रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नीता नितीन घोडके (रा. भारत माता चौकाजवळ, सदर बाजार, सातारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी राजेंद्र तुकाराम गायकवाड (वय 50, रा. यशोदानगर, गोडोली, सातारा) हे बांधकाम व्यवसायिक आहेत.
नवीन इमारतीसाठी कोणतेही तारण न घेता 3 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला 18 हजार 800 रुपये प्रोसेसिंग फी म्हणून एका वित्तीय संस्थेच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर 31 ऑक्टोबर 2024 रोजी 6 लाख 18 हजार रुपये आरटीजीएसद्वारे आरोपीच्या खात्यावर, तर 11 नोव्हेंबर 2024 रोजी गुगल पेद्वारे आणखी 18 हजार रुपये स्वीकारण्यात आले.
मात्र, रक्कम स्वीकारूनही कर्ज मंजूर झाले नाही. तसेच पैसे परत करण्याबाबतही टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. 17 ऑक्टोबर 2024 ते 28 जून 2026 या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद असून, सहायक पोलीस निरीक्षक बिले अधिक तपास करत आहेत.