महाराष्ट्रात दुधाचे दर वाढले

by Team Satara Today | published on : 15 March 2025


पुणे : महिनाभरापूर्वीच अमूलने दुधाच्या दरात लीटरमागे १ रुपयाची कपात केलेली होती. हा दिलासा फार काळ टिकलेला नाही. महाराष्ट्रात आजपासून दुधाच्या दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजापासूनच लागू झाले आहेत. यासाठी पुण्यात मोठी बैठक घेण्यात आली होती.   

महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडलेले आहे. आता प्रत्येक गोष्टीला जादा पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांत वस्तूंच्या किंमती जवळपास दुप्पट झाल्या आहेत. घर खर्च भागविताना नाकीनऊ येत असताना गेल्या काही वर्षांपासून दुधाचे दर दोन-दोन रुपयांनी वाढविण्यात येत आहेत. सध्या १ लीटर दुधाच्या पिशवीसाठी ५४-५६ रुपये मोजावे लागत आहेत. आता त्यात आणखी वाढ झाली आहे. 

दूध उत्पादक आणि डेअरी कल्याणकारी संघटनेच्या सदस्यांनी महाराष्ट्र सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (कात्रज डेअरी) च्या पुणे जिल्ह्यात दरवाढीवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. विविध सहकारी आणि खाजगी दुग्ध संघटनांच्या ४७ प्रतिनिधींनी या निर्णयाला एकमताने मान्यता दिली. यामुळे ही वाढ झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, मानद सचिव प्रकाश कुतवळ, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, श्रीपाद चितळे, पुणे जिल्हा संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे आदी या बैठकीला उपस्थित होते. 

आजपासून राज्यातील दुध ग्राहकांना एक लीटर दुधासाठी दोन रुपये जादा मोजावे लागणार आहेत. गाईच्या दुधासाठी आजवर ५४-५६ रुपये मोजावे लागत होते. ते आता ५६-५८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हैशीच्या दुधासाठी आजवर ७०-७२ रुपये मोजावे लागत होते. ते आता ७२ ते ७४ रुपये होणार आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डोंगराला लावलेल्या वणव्‍यात दोन आराम बस जळून खाक
पुढील बातमी
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'कला जीवनगौरव पुरस्कार' प्रदान

संबंधित बातम्या