डॉ. आंबेडकरांना पाहिलेल्या रुक्मिणीबाई काळाच्या पडद्याआड

रविवारी जलदान विधी व पुण्यानुमोदन

by Team Satara Today | published on : 07 September 2024


सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलेल्या आणि त्यांच्या विचाराला अनुसरून धम्माच्या वाटेवर प्रवास करणार्‍या रुक्मिणी बाबुराव म्हस्के यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्षे होते. त्याच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन स्नुषा, सहा नातंवडे असा मोठा परिवार आहे. रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी जलदानविधी व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होणार आहे.
परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव म्हस्के व प्राचार्य चंद्रकांत म्हस्के यांच्या त्या मातोश्री होत्या. रुक्मिणी म्हस्के यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वतःच्या जीवनव्यवहारात जपला. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले, त्यावेळी असंख्य स्त्रियांना सोबत घेऊन अंत्ययात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या. वामनराव म्हस्के, चंद्रकांत म्हस्के या मुलांना घडवून आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करून समाजात त्यांनी आदर्श निर्माण केला. जुन्या पिढीतल्या आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेल्या रुक्मिणी म्हस्के असल्याने आवर्जून त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यास महिला येत असत.
गुरुवारी रात्री रुक्मिणीबाई यांची प्रकृती ढासळली आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान मृत्यूची बातमी वेगाने पसरली आणि सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली. रात्रभर लोकांची पाऊले वामराव म्हस्के यांच्या निवासस्थानाकडे वळू लागली. शुक्रवारी सकाळी रुक्मिणी म्हस्के यांच्यावर कृष्णा - वेण्णा नदीच्या संगम तिरावरील स्मशानभूमीत असंख्य जसमुदायाच्या साक्षीने व बुध्दंम् सरणं गच्छामी, धम्मम् सरणंम् गच्छामी, संघम् सरणंम् गच्छामीच्या सुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 
रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जेतवन बुध्दविहार गोडोली येथे जलदान विधी व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात बाप्पांचे वाजत गाजत आगमन
पुढील बातमी
बोरगाव ठाण्याअंतर्गत दहा जण हद्दपार

संबंधित बातम्या