सातारा : शासकीय यंत्रणेकडून जिल्ह्यातील सहा दुष्काळी तालुक्यांत बांधावर जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. हे प्रमाण २५ टक्क्यांच्या सुमारास आहे. त्यामुळे संपूर्ण पंचनामे पूर्ण होण्यासाठी अजून आठवडाभर अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यातच शासनाकडून मदत किती मिळणार हे स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.
सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस १७ टक्के कमी झाला. त्यामुळे यावर्षी दुष्काळाची गडद छाया आहे. शासनाने कमी पर्जन्यमान झालेल्या माण, खटाव, फलटण, खंडाळा, सातारा आणि महाबळेश्वर या सहा तालुक्यांत ट्रिगर १ लागू केला आहे. त्यानुसार पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यासाठी कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलिस पाटील यांच्याकडून पीक पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. .
जिल्ह्यात सहा तालुक्यांत दुष्काळाचा ट्रिगर १ लागू करण्यात आला आहे. या तालुक्यांतील सुमारे १ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे होण्याचा अंदाज आहे. बाजरी, मका, तूर, ऊस आदी पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे पंचनामे करावे लागत आहेत. यासाठी कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलिस पाटील यांची टीम आवश्यक आहे. त्यातच सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांकडे दोन-तीन गावांचा कारभार असल्याने पंचनाम्यांना वेळ लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन जात नसल्याने अधिकाऱ्यांना दररोज किमान सात-आठ किलोमीटरची पायपीट करून पंचनामे पूर्ण करावे लागत आहेत.
दि. ६ ऑक्टोबर अखेरची पंचनामे स्थिती
तालुका - क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सातारा - ३,४७७
खटाव - ६,०९१
माण - १६,८२४
फलटण - ४,४५५
खंडाळा - ३,८०२
महाबळेश्वर - २,७०२
जिल्ह्यातील सहा दुष्काळी तालुक्यांत ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; संपूर्ण पंचनामे पूर्ण होण्यासाठी अजून आठवडा लागणार
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा