सातारा : सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, एका ऊसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकरी रविंद्र घोरपडे यांच्या मालकीच्या ऊसाच्या शेतात हा मृतदेह आढळून आला.
वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. विशेष म्हणजे या बिबट्याचे चारही पंजे कापून वेगळे करण्यात आले असून, एकूण १८ नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र बिबट्याचे दात आणि मिशा सुस्थितीत असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र चारही पाय कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने वापरण्यात आली का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेमुळे मत्त्यापूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांवरील वाढते हल्ले आणि बेकायदेशीर शिकारीच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, धुळे-शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारातील एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना काल (दि. 13) सायंकाळी घडली होती. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती शेतमालकाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवले असता वन विभागाने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पकडण्यात रात्री उशिरा वन विभागाला यश आले असून या बिबट्याला पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा बिबट्या शिरपूर तालुक्यात दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकुलत्या असलेल्या मुलाला बिबट्याने नातेवाइकांच्या डोळ्यांसमोर उचलून नेत ठार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नरभक्षक बिबट्याला ठार करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, परिसरात अनेक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, वनविभागाकडून रात्रभर बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू होती.