रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जनता बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल

अमोल मोहिते; विनातारणी कर्ज सुविधा पुन्हा सुरु

by Team Satara Today | published on : 24 July 2025


सातारा : सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त जनता सहकारी बँक लि., सातारा वर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे कार्यालयाने सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क नुसार लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.   त्यामुळे गत ५ वर्षापासून बंद असलेले विनातारणी सामान्य कर्ज, सभासदांसाठी सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

पत्रकात आर्थिक वर्ष २०२२-२३अखेरची रिझर्व्ह बँकेकडून बँकेची वार्षिक तपासणी झालेली असून वैधानिक लेखापरीक्षण २०२४-२५ पर्यंत पूर्ण झाले आहे. सन २०२२-२३ पासून बँकेच्या आर्थिक स्थितीचा रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी आढावा घेवून बँक आर्थिकदृष्टया अत्यंत सक्षम झाल्याने गेली जवळपास १० वर्षे लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेतलेले आहेत. त्यामुळेच बँकेच्या संचालक मंडळाने, बँकेच्या सभासदांकडून वारंवार मागणी केल्याप्रमाणे विनातारणी कर्ज सुविधा सुरु करण्याचा निर्णय प्राधान्याने व तत्परतेने घेतला आहे .त्याप्रमाणे यापूर्वी ज्या सभासदांनी  बँकेकडील विनातारणी सामान्य कर्जाची वेळेत व नियमितपणे परतफेड केली आहे, अशा सभासदांना विनातारणी कर्ज सुविधेचा लाभ घ्यावा याकरिता बँकेकडून विनंती पत्र पाठवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बँकेने या संदर्भात तयार केलेल्या विनातारण सामान्य कर्ज योजनेची  प्रत  बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे.तरी सर्व सभासदांनी या योजनेचे अवलोकन करण्यासाठी बँकेच्या नजीकच्या शाखेस भेट देऊन, योजनेचे अवलोकन करून विनातारणी सामान्य कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आल्े आहे.

बँकेवर सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क लागू असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे गेले दीड वर्ष प्रलंबित, मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यास परवानगी मिळणे बाबतचा  प्रस्ताव सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क पूर्णत: शिथिल झाल्याने नजीकच्या काळात निश्चितच मंजुरी मिळेल अशी माहितीही मोहिते यांनी दिली.

वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेल्या बँकेच्या आर्थिक मापदंडा नुसार बँकेने सलग दुसऱ्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेचे आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन (एफएसडब्ल्यूएम )चे सर्व निकष पूर्ण केले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करून गेल्या एक दशकापेक्षा जास्त काळ बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, सर्व संचालक मंडळ सदस्य, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य, अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने बँकेचा कारभार चालवत आहे.  सातारकरांची हक्काची बँक सहकार क्षेत्रातील महाराष्ट्रातील नंबर १ ची बँक करणार, असा आम्हाला आत्मविश्वास आहे - विनोद कुलकर्णी, पॅनेलप्रमुख, भागधारक पॅनल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'सैयारा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या 'या' नवोदित अभिनेत्रीचा प्रवास
पुढील बातमी
एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरी; पाच हजारांचा दंड

संबंधित बातम्या