सातारा : सातार्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुकानदारांना बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून 5 लाख 23 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांका ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन मुकुंदराव दिंडोरकर (वय 53) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. किशोर दिलीप साटव (रा. मल्हारपेठ, सातारा) असे स्वतःचे नाव सांगणार्या एका व्यक्तीने 27 जून रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील रांका ज्वेलर्सच्या दुकानातून 23 ग्रॅम 840 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चैन घेतली. या खरेदीचे 3 लाख 48 हजार रुपये बिल झाले असताना, आरोपीने ते पैसे एनईएफटी द्वारे पाठवल्याचा बहाणा करत मोबाईलवर पैसे ट्रान्सफर केल्याचा स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवला आणि प्रत्यक्षात कोणतेही पैसे न देता सोन्याची चैन घेऊन तिथून पळ काढला. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.
दुसर्या घटनेत, रविवार पेठेतील एस एस मोबाईल शॉपीमध्ये अज्ञाताने पावणेदोन लाख रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल खरेदी करून ऑनलाइन पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून फसवणूक केली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.