आरएसएस प्रणित भाजपने देश वाळवीसारखा पोखरून काढला : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी.एम संदीप यांची टीका

by Team Satara Today | published on : 12 October 2025


सातारा : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारा आणि प्रवृत्तीने देश वाळवीसारखा पोखरून काढला, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी बी.एम. संदीप यांनी केली. 

येथील काँग्रेस  भवनातील महात्मा गांधी सभागृहात आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना श्री संदीप यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजन कामत, यासिन शेख, उमेश खंदारे, नंदकुमार शेळके, सचिन आडेकर आणि मनेश राऊत हे प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक - पदाधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना कठीण काळातून जात असतानाही आपण पक्षासाठी संघर्षाची भूमिका घेऊन पुढे निघाला आहात. जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भक्क होण्यास मदत होईल, असा विश्वास सुरुवातीलाच व्यक्त करून ते म्हणाले, भाजप आणि आरएसएस हे सुरुवातीपासूनच मनुवादी विचार प्रवृत्तीचे आहेत. या प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रयत्न सुरू आहेत.

ज्यांनी वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून गुजरात प्रदेश स्टेडियमला स्वतःचे नाव दिले परंतु नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा .पाटील यांचे नाव देण्याचे उमदेपण त्यांच्याकडे नाही, अशी खंत व्यक्त करीत श्री संदीप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

देशाचा इतिहास आणि संविधानाच्या संरक्षणाची काँग्रेस पक्षाने नेहमीच काळजी वाहिली; परंतु आरएसएस प्रणित भाजप सरकारने भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवत देश वाळवीसारखा पोखरला, असे सांगून ते म्हणाले  ' चार सौ पार ' चा नारा देणाऱ्या मोदींना मेटाकोटीने 240 जागा मिळाल्या.  इतर पक्षाच्या सहाय्याने सरकार बनवावे लागले. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार नोंदणीत हेराफेरी केली नसती तर एवढ्या जागाही त्यांना मिळाल्या नसत्या. पक्षाचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष खर्गे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढील काळातही संघर्ष करून भाजपचे खरे रूप उघडे करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष रणजीत  देशमुख यांनी गेल्या दोन महिन्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधली जाईल, असे सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते  विजयराव कणसे, बाबासाहेब कदम ,रफिक बागवान, झाकीर पठाण, प्रतापसिंह देशमुख, रजनी पवार आदींनी  उपस्थितांचे स्वागत केले.

शाहूपुरी येथे 'व्होट  चोर ; गद्दी छोड ' स्वाक्षरी अभियानाला भेट

दरम्यान, सकाळी शाहूपुरी येथे 'व्होट  चोर ;गद्दी छोड ' या मोहिमेअंतर्गत स्वाक्षरी अभियानाला श्री. संदीप यांनी भेट दिली. याप्रसंगी सातारा तालुका अध्यक्ष अजित कदम, शहराध्यक्ष रजनी पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन खराडे आदि  उपस्थित होते. काँग्रेस भवनातील मेळाव्यानंतर श्री संदीप यांनी तालुकानिहाय बैठक घेऊन तालुकाध्यक्षांमार्फत राजकीय परिस्थिती आणि संघटनेचे कामकाज जाणून घेत उपयुक्त सूचना केल्या .

याप्रसंगी तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्याना श्री संदीप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष   प्रतापसिंह देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला काँग्रेस काँग्रेसच्या पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष ,विविध सेलचे जिल्हाध्यक्ष  - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासपडे खून प्रकरणातील संशयित आरोपीला १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
पुढील बातमी
साताऱ्यात रंगणार हिंद केसरीच्या कुस्त्यांचा थरार; भारतीय कुस्ती महासंघ व राजेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन

संबंधित बातम्या