कोरेगाव : शहर व तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कोरेगाव शहरात शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर, तालुका आणि विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीला नवे बळ मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर नव्या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजीतसिंह भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधणार असून, आगामी राजकीय दिशा आणि संघटनात्मक धोरणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
उद्घाटनानंतर पालकमंत्री देसाई, राजाभाऊ बर्गे आणि इतर मान्यवर कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते राजाभाऊ बर्गे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
या दौऱ्याबाबत माहिती देताना राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटनही पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात येणार असून, तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात सहभागी करून घेत, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही बर्गे यांनी स्पष्ट केले.