लोणंद : संपूर्ण महाराष्ट्रात शिव्या देण्याची अनोखी परंपरा असलेला ‘बोरीचा बार’ यंदाही परंपरागत पद्धतीने मंगळवारी दुपारी बारा ते एक या वेळेत खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी दरम्यान वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही तीरांवर उत्साहात पार पडला. दोन्ही गावांतील महिलांनी सनई-हलगीच्या तालावर वाजत गाजत ओढ्यावर एकत्र येऊन एकमेकींवर शिव्यांचा भडिमार करत ही अनोखी परंपरा जपली.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड व बोरी गावातील बोरीचा बार राज्यात प्रसिद्ध आहे. या दिवशी दोन्ही गावांतील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात. गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात. बोरीचा बार सुरू होताना दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन ओढ्यावर शिव्यांची लाखोली वाहत असतात. त्यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करतात.
श्रावणातल्या षष्ठीला हा बोरीचा बार साजरा होताना हलगी व सनईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता. बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदैवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या. तेथून या महिला झिम्मा, फुगडी, फेर धरत ओढ्यापर्यंत गेल्या. यंदा ओढ्याला पाणी कमी असल्याने त्यांनी सुरुवातीला ओढ्याच्या काठावर उभे राहून पैलतीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करत बोरीच्या बाराची सुरुवात केली तर नंतर दोन्ही बाजूकडील महिलांनी हातवारे करत यंदाचा बार उत्साहात साजरा केला.
अशी आहे प्रथा...
या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. एक पाटील होते. त्यांना दोन बायका होत्या. पैकी एक सुखेड तर दुसरी बोरी या गावातील होती. त्या दररोज दोन्ही गावाची शिव असणाऱ्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी येत होत्या. ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यात वाद होऊन दोघी एकमेकींना हातवारे करत शिव्या द्यायच्या. यावरून ही ‘बोरीचा बार’ अशी प्रथा सुरू झाली, असे ग्रामस्थ सांगतात. दोन्ही गावातील सासरी गेलेल्या महिला सुद्धा माहेरी येतात केवळ जिल्ह्यातूनच नव्हे; तर इतर जिल्ह्यांतूनही हा बोरीचा बार पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते.