बीड : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्याकडून नवी माहिती उघड झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीला सरेंडर केलं होतं. त्यानंतर अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला शुक्रवारी (03 जानेवारी) ताब्यात घेण्यात आले. यानंतर सदर प्रकरणातील विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार झाले. पण कृष्णा आंधळे वगळता आता इतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुलेची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन मुंबईनजीकच्या भिंवडीत दाखल झाला. भिवंडीत सामाजिक संस्था चालक सोन्या पाटील यांच्या कार्यालयात गेला. त्याठिकाणी त्याने सोन्या पाटील यांचे बंधू जयवंत पाटील यांची भेट घेतली. त्या कंपनीत त्यांच्या गावाताली मुलगा विक्रम डोईफोडे हादेखील काम करतो, हे त्याला माहिती होते. सुदर्शन घुलेने जयवंत पाटील यांच्याकडून विक्रम डोईफोडेंचा पत्ता मिळवला. विक्रम डोईफोडेंचा पत्ता मिळाल्यानंतर तो आणि त्याचे साथीदार वळ पाडा येथील बारवर पोहचले, तिथे त्यांनी विक्रम यांच्याकडे एकदोन दिवस लपण्यासाठी मदत मागितली. पण विक्रम यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी तिथूनही पळ काढला. तिथून त्यांनी थेट गुजरात गाठले.
वळपाडा येथे विक्रम डोईफोडे यांच्या हॉटेलवर लपण्यासाठी जागा न मिळाल्याने लघुशंकेला जातो असं सांगून सुदर्शन घुलेने तिथूनही पळ काढला, त्यानंतर तिघांनीही थेट गुजरात गाठलं. या तिघांनीही एका मंदिरात आसरा घेतला. जवळपास 15 दिवस ते त्याच मंदिरात राहिले. धक्कादायक म्हणजे, भिवंडीत आल्यानंतर त्याने ओळख लपवण्यासाठी सुदर्शनने मिशा कापल्या. याचा एक फोटोही समोर आला आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाल्यानंतर केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर केज न्यायालयाने या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांची चौकशी झाल्यानंतर, माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी गेवराई पोलीस ठाण्यात आहेत, तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.