अखेर कराडकरांनी दाखवून दिलेच..!‌

राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची ती 'पाटी' पुन्हा चर्चेत

by Team Satara Today | published on : 22 December 2025


सातारा :  संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना  एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर निवडणुकीपूर्वीच त्यांच्या समर्थकांनी तयार केलेल्या नगराध्यक्ष मा. श्री. राजेंद्रसिंह आत्माराम यादव या पाठीशी संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली असून अखेर कराडकर यांनी दाखवून दिलेच, अशा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

कराड नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना गटात जागावाटपावरून तसेच नगराध्यक्ष पदावरून तीव्र मतभेद झाले होते. त्यामुळे भाजपाशी फारकत घेत एकनाथ शिंदे शिवसेना गटाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेत कराड नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने यशवंत- लोकशाही आघाडीची स्थापना करून या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्रसिंह यादव यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. नगराध्यक्ष पदाससह नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांच्या समर्थकांनी राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची पार्टी तयार करून ती त्यांच्या कार्यालयात काही वेळ ठेवली होती. या संदर्भात ६ डिसेंबर रोजी त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या निमित्ताने कराडसह संपूर्ण राज्यभरात या घटनेची चर्चा सुरू झाली होती.

या निवडणुकीत भाजपकडून जिल्हाध्यक्ष तथा आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पूर्ण ताकत लावली तर यशवंत- लोकशाही आघाडीकडून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी एकट्याने खिंड लढवली. काल रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी कराड नगरपालिकेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांच्या यशवंत विकास आघाडीला नगराध्यक्ष पदासह आठ जागा, लोकशाही आघाडीला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या तर सत्ताधारी भाजपला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. 

नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्रसिंह यादव विजयी होताच दि. ६ डिसेंबर रोजी त्यांच्या समर्थकांनी मा. श्री. लोकनियुक्त  नगराध्यक्ष राजेंद्रसिंह आत्माराम यादव यांच्या नावाची तयार केलेल्या पाटीची सर्वांनाच आठवण झाली. थोडक्यात कराडकरांनी नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्रसिंह यादव यांच्या नावालाच पसंती दिली होती, हे निकालावरून स्पष्ट होत असले तरी राजेंद्र सिंह यादव यांच्या समर्थकांना असलेल्या आत्मविश्वासाबाबत सोशल मीडियावर चांगल्यात चर्चा झडू लागल्या आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अखेर फडफडणारा दिवा निमाला
पुढील बातमी
गड गेला मात्र सिंह आला ; आ. अतुल भोसले यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

संबंधित बातम्या