कास : ज्या बाहेरच्या लोकांचा मुनावळे येथील जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे, त्याला आमचा कडक विरोध राहणार आहे. स्थानिक लोकांना जमिनी देण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी देणारच, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे दिली.
जावळी तालुक्यातील सर्व विभागांच्या आढावा बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. कोयना जलाशयात विस्थापित झालेल्या मुनावळे गावच्या गावठाणाचा व स्थानिकांच्या धरणाच्या लगत असणाऱ्या उर्वरित जमिनींबाबतच्या प्रश्नावर लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली जाईल, असेही शिवेंद्रराजे यांनी सांगितले.
ज्या बाहेरच्या लोकांनी जमिनी घेतल्या आहेत व जे तिथे जमिनी मागत आहेत, हे आम्हाला स्थानिक म्हणून अजिबात मान्य नाही. स्थानिकांचा सातबारा करून देण्याचा प्रश्न उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना सांगितला असून, लवकरच यावर तोडगा निघेल. आपल्याच ज्या जमिनी आहेत आणि त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. बाहेरच्यांचं काही चालू देणार नाही, असा सज्जड इशाराही मंत्री शिवेंद्रराजे यांनी दिला.
दरम्यान, जावळी तालुक्यातील जलजीवन योजनेंतर्गत असणारी सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी जिल्हा नियोजन मंडळातून निधी द्यावा लागला तरी तो देणार असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले, तसेच महू धरणासाठी वहागाव ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आढावा बैठकीसाठी महसूल, पाणीपुरवठा, पंचायत समिती, महावितरण, वन विभाग, बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन आदी विभागांचे अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत प्रथम जलजीवन योजनेचा आढावा घेण्यात आला. तालुक्यातील १२८ गावांच्या जलजीवन योजनांच्या मंजुरीपैकी १२६ योजनांचे काम सुरू असून, सुधारित ९२ योजनांसाठी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती जलजीवनच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी बोंडारवाडी धरणाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असता ट्रायल पिट सुरू करण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील काही ठिकाणी वन विभाग रस्ते अडवत असून, अतिरिक्त रस्ते सुद्धा वन विभाग का अडवीत आहे? असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी उपस्थित केला, तसेच वन विभागाकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून, वनरक्षक लोकांना अडवून मुजोरपणा करत आहेत. वनक्षेत्रात जनावरे चरायला नेल्यावर दोन हजारांची पावती करा, असे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे, असे सांगितल्यावर मंत्री भोसले यांनी संबंधिताला निलंबित करा, अशा सूचना केल्या.
यावेळी या बैठकीसाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध खात्यांचे सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकुमरे, जयदीप शिंदे, सागर धनावडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच व हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, आज कोयना धरणग्रस्तांमधील बामणोली गावातील खातेदारांना त्यांच्या हक्काच्या सातबाराचे वाटप मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. एकीकडे मुनावळेकर जमिनींसाठी संघर्ष करत असताना बामणोलीकरांना सातबारा मिळाल्याने त्यांनी आनंद साजरा केला.
ग्रामस्थांच्या मागण्या :
बोंडारवाडी धरण व्हावे.
महू धरणाचे काम पूर्णत्वास जावे.
मेढा आगारास नवीन एसटी बस मिळाव्यात.
मेढ्यात महिलांसाठी स्वच्छतागृहांची बांधणी करावी.
मेढ्यात नाना नानी पार्क उभारावा.
सरपंच भवन व्हावे.
आनेवाडी टोल नाक्यावर दोन्ही बाजूला शौचालयाची व्यवस्था व्हावी.
आनेवाडी ते रायगाव मार्गावर विद्युत दिव्यांची सोय व्हावी.