‘डॉन ३’मध्ये कोण बनणार खलनायक?

समोर आलं प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची 'डॉन ३'साठी निवड झाली, तेव्हा चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या फ्रँचायझीच्या सिक्वेलची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. यानंतर या चित्रपटात व्हिलन अर्थात खलनायक कोण सकरणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. पण, जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा रणवीर सिंह आता यात शाहरुख खानची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले होते. २ वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची घोषणा झाली होती, पण या चित्रपटाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पण आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, जे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवणार आहे.

'डॉन ३'मध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे निर्मात्यांनी निश्चित केले आहे. एका रिपोर्टनुसार, विक्रांत मेस्सी या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अलीकडच्या काळात विक्रांत मेस्सीच्या कारकिर्दीचा आलेख खूप वेगाने वर गेला आहे. कोणताही जड प्रोस्थेटिक किंवा मेकअप नसतानाही त्याने आपल्या व्यक्तिरेखांमध्ये केवळ जीव ओतून त्या भूमिका अक्षरश: जीवंत केल्या. यामुळेच अभिनेत्याचे खूप कौतुक झाले आहे. आता फरहान खानने आपल्या पुढच्या चित्रपटासाठी खलनायक म्हणून ‘बारावी फेल’मधील मुख्य अभिनेता विक्रांत मेस्सीची निवड केली आहे. त्यामुळे रणवीर आणि विक्रांत पडद्यावर एकत्र किती छान वातावरण निर्माण करतील आणि प्रेक्षकांचे किती मनोरंजन करतील, याची कल्पना करूनच सगळे आतुर झाले आहेत.

फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, ‘डॉन ३’मध्ये विक्रांत मेस्सी खलनायकाची भूमिका साकारणार आहे. सोशल मीडियावर ही बातमी येताच चाहत्यांमध्ये रोमांचाची लाट उसळली असून लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत. याला कारण देखील विक्रांत स्वतः आहे. काही दिवसांपूर्वीच विक्रांत मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आता तो नवा चित्रपट कसा काय करत आहे, असा प्रश्न काही जणांनी विचारला आहे. स्वत: विक्रांत मेस्सीने आपल्या व्यक्तव्याने लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचं स्पष्ट केलं होतं. आपण आपल्या निवृत्तीबद्दल बोललोच नव्हतो, असे त्याने म्हटले आहे. डॉन सीरिजच्या आधीच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं होतं.

मागील बातमी
खोकला गेला पण कफ त्रास देतोय?
पुढील बातमी
शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीग फेब्रुवारीमध्ये रस्त्यावर उतरणार

संबंधित बातम्या