बुडणार्‍या मुला-मुलीला वाचवताना अभिनंदन झेंडेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 25 April 2025


कराड : कोयना नदीपात्रात बुडणार्‍या मुलगी आणि मुलाला वाचविताना अभिनंदन रतन झेंडे (वय 34, रा. शाहू चौक, कराड) याचा बुडून मृत्यू झाला. जुन्या ब्रिटिशकालीन पुलानजीक गुरुवारी सकाळी ही घटना घडली. मृत अभिनंदन झेंडे याच्यावर कराड शहर तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अभिनंदन झेंडे हा गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याची मुलगी व मुलाला घेऊन कोयना नदीपात्रात पोहायला गेला होता. मात्र, पोहोताना मुलगी व मुलगा अचानक गटांगळ्या खात असल्याचे अभिनंदनच्या निदर्शनास आले. त्याने त्या दोघांकडे धाव घेतली. मात्र, मुलीने अभिनंदनला मिठी मारली. तो दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहताच अमर गायकवाड व रोहन चौगुले यांनीही तातडीने नदीपात्रात उड्या घेतल्या. 

अमर गायकवाड याने मुलीला पाण्यातून ढकलत बाहेर काढले. तर रोहन चौगुले हा मुलाला घेवून नदीपात्रातून बाहेर आला. मात्र, अभिनंदन झेंडे नदीपात्रातून बाहेर आला नाही.

त्याचा शोध घेतला असता तो बुडाल्याचे निदर्शनास आले. ही माहिती कळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नदीपात्रात शोध घेवून मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे.

कराड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, दहशत माजवण्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला अभिनंदन झेंडे हा शहरातील शाहू चौकात वास्तव्यास होता. त्याच्यावर तडीपारीची कारवाई यापुर्वी झाली होती. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो शाहू चौकात वास्तव्यास आला होता. गत काही वर्षांपासून तो गुन्हेगारीपासून अलिप्त होता. त्याच्या वर्तणुकीतही सुधारणा झाली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा
पुढील बातमी
पंढरपूर तालुक्यात शेतकऱ्यांचा अज्ञात व्यक्तीने ऊस जाळला

संबंधित बातम्या