पुणे : जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले आहे. आता त्याला कोणती शिक्षा सुनावली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून न्यायालय 29 जून रोजी अंतिम शिक्षा जाहीर करणार आहे.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपीने हा गुन्हा पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर पद्धतीने केल्याचा दावा केला. पीडित बालिका सुट्टीसाठी आजीकडे आली असताना तिच्या हालचालींवर आरोपीने आधीपासून लक्ष ठेवले होते, अशी बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली.
राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या ५८ दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागणारा हा दुर्मिळ खटला ठरला आहे. या प्रकरणात पश्चातापाची कोणतीच भावना नसल्याचे दिसून आले आहे. न्यायालयात आरोपीला आणल्यावर न्यायाधीशांनी सर्वप्रथम त्याला त्याचे नाव विचारले. त्याने आपले नाव भीमराव कांबळे असे सांगितले. न्यायालयाने त्याला त्यावर निश्चित करण्यात आलेले सर्व कलम सिद्ध झाल्याचे सांगितले. प्रत्येक कलमात कोणती शिक्षा आहे ते न्यायालयाने त्याला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याला १ मे च्या दुपारी त्याने काय केले? हे पुन्हा आठव असे सांगितले. तेव्हा त्याने जबाबाचा पुनरुच्चार केला की मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. मी तिला खाटेवर झोपवले. त्यावर न्यायालयाने त्याला तेव्हाचा आणि आत्ताच प्रसंग काय आहे हे समजून सांगितले. मात्र त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची कोणतीच भावना नसल्याचे दिसून आले.
आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी
आमच्या मनात बदल्याची भावना नाही; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी.‘‘मी माझी मुलगी गमावली आहे. ती आता परत येणार नाही. आमच्या मनात बदल्याची भावना नाही. मात्र आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. आम्हाला न्याय मिळावा. कोणी क्रूर कृत्य किंवा अशा प्रकारचा अत्याचार केल्यास पोलिस आणि न्यायव्यवस्था त्या आरोपीला सोडणार नाही, असा संदेश समाजात जावा. तसे झाल्यास इतर कोणी असा गुन्हा करणार नाही. - पीडित मुलीचे वडील