सातारा : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील जनतेमध्ये निर्भयतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या काही पोलीस अधीक्षकांनी राजकीय मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे जिल्हा पोलिसांची राज्यभरामध्ये छी: थू झाली होती. मात्र, पिंगळे यांनी सव्वा तीन महिन्यांच्या कार्यकाळामध्ये निर्भेळ पोलिसिंगचा वापर करून सातारा जिल्हा पोलीस दलाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून दिले आहे.
पिंगळे यांनी 23 एप्रिल 2026 रोजी सातारा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या रणकंदनामुळे तत्कालीन एसपींची तडकाफडकी बदली झाली होती. सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कांडामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला होता. भाजप-शिंदे सेना कळवंडीमुळे महायुती तुटतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करत हुकूमाचे ताबेदार असणाऱ्या पोलीस प्रमुखांनाच तोफेच्या तोंडी देऊन त्यांना सांगलीला धाडले. कर्तव्याचा चुथडा झालेल्या सातारा पोलिसांना यानिमित्ताने तगडा गडी देऊन फडणवीसांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले. पिंगळे यांनीसुद्धा सातारा पोलीस दलाचा चार्ज घेताच आपल्या लौकिकास साजेसे काम करायला सुरुवात केली.
गेल्या साडेचार-पाच वर्षांमध्ये सातारा पोलिसांची रसातळाला गेलेली प्रतिमा सुधारण्याचे पिंगळे यांच्यासमोर आव्हान होते. परंतु त्यांनी हे आव्हान लिलया पेलले. यापूर्वीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी (म्हणजेच गेल्या चार वर्षांमध्ये) घरगड्यांना लाजवेल असे काम केले. पोलिसिंगमध्ये हस्तक्षेप जरूर असावा, परंतु तो केवळ अन्नात मीठ असल्यासारखा. त्यामुळे जास्त मीठामुळे कधीकधी रंगाचा बेरंग होतो, हे कळायला तत्कालीन पोलीस प्रमुखांना वेळ लागला. परंतु वेळ कोणासाठी थांबत नसते. समय से बलवान कोई नहीं होता, हेच तत्कालीन पोलीस प्रमुखांना नडले. पोलीस प्रमुखाच्या खुर्चीवर बसण्याआधीच त्यांनी थोरला वाडा, धाकला वाडा आणि साहेबांचा बंगला गाठला. स्वखर्चाने आणलेला बुकेही दिला. हा उलटा पायंडा तत्कालीन दोन पोलीस प्रमुखांनी पाडला. परंतु पिंगळे मात्र त्याला अपवाद ठरले. मी लोकसेवक आहे, आणि लोकांचीच सेवा करणार. भेटायचे असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय उघडेच आहे, असा अप्रत्यक्षरीत्या संकेत आपल्या कार्यातूनच दिला.
गेल्या सव्वा तीन महिन्यांमध्ये कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय सातारा पोलिसांचे कामकाज सुरू आहे. पोलिसांच्या धडाक्यामुळे गुंडा-पुंडांचे धाबे दणाणले आहेत.
नुकत्याच झालेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये सातारा पोलिसांनी कडक आणि चोख बंदोबस्त देऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली होती.
23 मे 2026 रोजी अमेरिकेतील लोकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ब्लॅकमेल करणाऱ्या कोरेगाव येथील आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा टाकून 21 लाखांच्या रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटकही केली होती. आतापर्यंत अग्नीशस्त्रे, अंमली पदार्थ, तोतया पोलीस, कराड येथील पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्यास चोवीस तासांत गजाआड करणे असो किंवा सायबर गुन्ह्यांशी संबंधित अनेक गुन्ह्यांची उकल करून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कार्यशैलीची सातारा पोलिसांनी चुणूक दाखवली आहे. पोलिसांना फ्री हॅण्ड दिल्यानंतर पोलीस काय करू शकतात, हे गेल्या सव्वातीन महिन्यांमध्ये जिल्हावासीय उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
गेल्या साडेचार-पाच वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जुगार, चक्री तसेच इतर अवैध धंद्यांना ऊत आला होता. जिकडे-तिकडे हप्तेखोरी बोकाळलेली होती. राजकीय हस्तक्षेपामुळे अनेकांवर नाहक खोटे गुन्हे दाखल होत होते. राज्यभरामध्ये सातारा पोलिसांच्या असलेल्या प्रतिमेला अशा पोलिसिंगमुळे तडा गेलेला होता. सत्ताधारी आणि त्यांचे चेलेचपाटे सातारा पोलिसांच्या बोटचेपी धोरणामुळे बेखौफ झालेले होते. 'खलनिग्रहणाय, सद्ररक्षणाय' हे सातारा पोलिसांसाठी फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिलेले होते.
जिल्ह्यात सव्वा तीन महिन्यांपूर्वी अंमली पदार्थांशी संबंधित अनेक घटना घडलेल्या होत्या. मुंबई-पुणे पोलिसांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाव परिसरात जाऊन अंमली पदार्थांच्या कारखान्यावर धाड टाकून सातारा पोलिसांचे नाक कापले होते. परंतु पिंगळे यांनी पदभार स्वीकारताच अंमली पदार्थांविरोधात झिरो टोलरन्स पॉलिसी अवलंबल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थ माफियांची तंतरली आहे. संघटित गुन्हेगारांच्या कुंडल्या काढून त्यांच्या मुसक्या आवळल्याने सातारा जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कदाचित हेच साडेचार-पाच वर्षांपूर्वी घडायला हवे होते. मात्र, यापूर्वी सगळे जिल्ह्यात कमवायला आलेले होते. त्यांचे सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेशी काहीही देणेघेणे नव्हते. सकाळ-संध्याकाळ सत्ताधारी पुढार्यांच्या मागेपुढे करून जी साहेब, हो साहेब म्हटल्यानंतर सर्वकाही आलबेल आहे, असा ते स्वतःचा समज करून घेत होते. मात्र, ये पब्लिक है, सब जानती है. शेवटी कुठे ना कुठे माज मोडला जातो. झेडपीच्या निमित्ताने पापाचा घडा फुटला.
तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अजयकुमार बन्सल यांच्यापर्यंत सातारा पोलिसांचा सुवर्णकाळ होता. परंतु त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी कंबरेचे सोडून डोक्याला बांधल्याने सातारा पोलीस अधीक्षक पदाची पूर्णतः शोभा झाली. सातारा एसपी इज इक्वल टू घरगडी, अशी काही प्रतिमा होऊन बसली.
सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी सातारा टुडेने पंतप्रधान कार्यालयाची सल्लागार म्हणून शहरासह जिल्ह्यात मिरवणारी बबली आणि तिचा साथीदार बंटीचा पर्दाफाश केला होता. या दाम्पत्याने 2019 ते 2023 पर्यंत सातारा शहरामध्ये अक्षरशः हैदोस घातला होता. परंतु म्हणतात ना, देवाच्या काठीचा आवाज येत नाही. मात्र, सातारा टुडेचा आसूड यांच्या पेकाटावर चालला आणि भल्याभल्यांना पाणी पाजून खंबाटकीचा घाट दाखवणाऱ्या या जोडगोळीवर सातारा पोलिसांना सातारा टुडेच्या दट्ट्यामुळे गुन्हा दाखल करावा लागला. गेली तीन वर्षे बंटी-बबली ही जोडगोळी जेलचे वासे मोजत आहे. कदाचित त्यावेळी सातारा टुडेने त्यांचा पर्दाफाश केला नसता तर आज सगळ्यांनाच राष्ट्रीय सुरक्षेचा धोका पचवावा लागला असता. तत्कालीन पोलीस प्रमुखांनी बंटी-बबली जोडीला कशा पद्धतीने अभय दिले हे लिहायचे झाल्यास तत्कालीन एसपींना तोंड दाखवणेही अवघड होईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक बोलणे-लिहिणे उचित ठरणार नाही. मात्र, जो सुवर्णकाळ तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अजयकुमार बन्सल यांच्या कार्यकाळापर्यंत जिल्हावासीयांनी पाहिला, सुदैवाने त्यांचेच बॅचमेट निखील पिंगळे कप्तान म्हणून जिल्ह्याला लाभलेले आहेत.
गेल्या सव्वातीन महिन्यातील म्हणजेच शंभर दिवसांच्या कामगिरीत ते अ श्रेणी दर्जाने उत्तीर्ण झालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि शांतता, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवण्यासाठी पिंगळे यांना निश्चितपणे राजकीय दबाव झुगारून काम करावे लागणार आहे. पिंगळे सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्ती आहेत, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दिसून येते. सातारा पोलीस दलाला सुवर्णवैभव प्राप्त करून देण्यासाठी निश्चितच ते प्रयत्न करतील, याबाबत कोणाचेच दुमत नसावे.
फलटणमधील अंडरवर्ल्डला द्यावा लागणार व्हाईट वॉश
फलटण हे जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. 2015 पर्यंत गुन्हेगारीने धगधगणारे शहर तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केवल कागदी कारवायांनीच मोक्कास्त्र डागून शांत केले होते. राजकीय पदराआड लपणाऱ्या अनेक नामचीन गुन्हेगारांना कायद्याचा दंडुका उगारून दे माय धरणी ठाव करून सोडले होते. अवैध खाजगी सावकारीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या फलटण शहरामध्ये सामान्य लोकांना श्वास घेणेही जिकिरीचे होते. अशा अनेकांना संदीप पाटलांनी फलटणच काय, सातारा जिल्ह्यामध्ये फिरकू दिले नव्हते. त्यामुळे फलटणमध्ये होणारे मर्डर, हाफ मर्डर व जातीय दंगली शमल्या होत्या. परंतु गेल्या चार-साडेचार वर्षांमध्ये भूमिगत असलेल्या गुंडापुंडांनी पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केलेली आहे. अनेकांनी पक्षांतर करून आपले राजकीय पुनर्वसन करून घेतल्यामुळे जुन्याच बाटलीत नव्या दारूचा फॉर्म्युला सध्या फलटणमध्ये जोरात सुरू आहे. ठिकठिकाणी मटक्याचे व जुगाराचे अड्डे सुरू झाले आहेत. तू कर रे, मी आहेच, या एका शब्दाने पुन्हा एकदा फलटणमध्ये गुन्हेगारीने पाय पसरायला सुरुवात केली आहे. एकदा का फलटण धुमसायला सुरुवात झाली तर ही आग आटोक्यात आणणे, पोलिसांसाठी जिकिरीचे ठरणार आहे. त्यापेक्षा आत्ताच सोम्या-गोम्याचे पंख छाटावे लागणार आहेत. वरवर शांत दिसणारे फलटण शहर कधीही धुमसू शकते, याची खबरदारी म्हणून पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी फलटणकडे विशेष लक्ष देऊन व्हाईट कॉलर अंडरवर्ल्डला व्हाईट वॉश द्यावा लागणार आहे.
- संग्राम निकाळजे