सातारा : आर्यांग्ल हॉस्पिटल म्हटले की सातारा, अशी एक वर्षानुवर्षे सुरू असलेली आरोग्य सेवेची परंपरा आज विविध नवनवीन आरोग्य सुविधांनी विस्तारित होत आहे. आर्यांग्ल परिवाराच्या बांधण्यात येत असलेल्या नव्या भव्य इमारत तसेच विविध आरोग्य सुविधांच्या सोयींसाठी समस्त सातारकरांनी आपलेपणाने या कार्यात तन, मन, धन अर्पून सहभाग घ्यावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
आर्यांग्ल हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन, धन्वंतरी पूजन आणि विभागाचे फीत कापून उद्घाटन झाल्यावर प्रमुख मान्यवरांनी या विभागाची सविस्तर माहिती घेऊन पाहणी केली.
आर्यांग्ल परिवाराचे अध्यक्ष बाळकृष्ण जाजू, चेअरमन अजित मुथा, सेक्रेटरी विनोद झंवर, डॉ. प्रकाश चव्हाण, अनुप मुथा, मेघना बाफना, आर्याग्ल वैद्यक महाविद्यालयाचे - प्रभारी प्राचार्य डॉ. विनोद पतंगे, हॉस्पिटलचे आरएमओ डॉ. नितीन आरसुळ, सौ, प्रेमा मुथा उपस्थित होते.
चेअरमन अजित मुथा म्हणाले, अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने आर्यांग्ल सेवा विस्तार करीत आहे. त्यामध्ये दोशी परिवाराने दिलेली सढळ मदत ही या नव्या डायलिसिस विभागाच्या कार्यासाठी मोलाची ठरलेली आहे. सर्वांनी या आरोग्य सेवेत सहभाग घ्यावा. अतिशय अल्पदरात या सेवेचा उपयोग समाजातील गोरगरीब व गरजू रुग्ण व्यक्तींना होणार आहे.
सुभाष दोशी म्हणाले, आज शतकी वाटचाल करताना दोशी परिवाराच्यावतीने या कार्यात सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून समाज ऋण म्हणून ही मदत करताना आम्हाला मोठा आनंद झाला. आर्यांग्ल परिवाराचा असाच कार्यविस्तार भविष्यात वृद्धिंगत होवो.
मंदार बोकील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विनोद पतंगे यांनी प्रास्ताविक केले. समारंभास माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले यांचे अनुप मुथा, मेघना बाफना, श्री व सौ. सुभाष दोषी, अभिजात इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सचिन दोशी, डायलिसिस विभागाचे देणगीदार, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी, राजेंद्र चोरगे, डॉ. नावंधर, डॉ. फिरोदिया व आयुर्वेद प्रसारक मंडळाचे सर्व संचालक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.