फ्रॉड झालेले सुमारे दीड कोटी मिळाले मालाज कंपनीला परत

वाई गुन्हे प्रकटीकरण तसेच सायबर पोलिसांचे यश

सातारा : सायबर फ्रॉड झालेले एक कोटी 53 लाख रुपये वाई एमआयडीसीतील मालाज कंपनीला परत करण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेसह सायबर पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालाज कंपनीच्या फ्रुट प्रोसेसिंग प्लांट, वाई, ता. वाई, जि. सातारा येथे दि. 6 ते 29 जानेवारी दरम्यान अज्ञाताने कंपनीच्या ई-मेलवर फसवा ई-मेल पाठवून त्याच्या खात्यावर एक लाख 70 हजार युरो (भारतीय बाजारभावाप्रमाणे एक कोटी 53 लाख 52 हजार 700 रुपये) ट्रान्सफर करून घेतले. म्हणून वाई पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात दि. 10 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार अंतर्भूत असल्याने तसेच अपहाराची रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून वाई पोलीस ठाणे तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांच्या अधिकारी, अंमलदारांना वेगवेगळी तपास पथके तयार करून आरोपीचा शोध व फसवणूक झालेली रक्कम परत मिळवण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे सायबर पोलीस ठाणे व वाई पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांनी संबंधित लंडन स्थित विदेशी बँकेला नोटीस देऊन त्वरित सायबर फ्रॉड झालेली रक्कम होल्ड करण्यास सांगितले. तसेच ही एक कोटी 53 लाखांची रक्कम कंपनीला परत मिळवून दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर व सायबर पोलीस पथक करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, सायबर च्या महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा खोचे, जय गायकवाड, एडवोकेट रोहन सारडा यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.


मागील बातमी
फलटण तालुक्यातील दोन टोळ्यांमधील 13 जण दोन वर्षासाठी तडीपार
पुढील बातमी
सातारचा सूर्या श्वान सुवर्णपदकाचा मानकरी

संबंधित बातम्या