सातारा : बचतगट चळवळ ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मानिनी जत्रा प्रदर्शनासारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांच्या विद्यमाने ‘मानिनी जत्रा’ या ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाला ना. शिवेंद्रसिंहराजेंनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सातारा पंचायत समितीचे सतीश बुद्धे आदी उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट देऊन बचत गटातील माता- भगिनींचे कौतुक केले. बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, खाद्यपदार्थ व इतर मालासाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पथदर्शी व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ना. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.