कोयनेच्या जलाशयाने गाठला तळ; पाण्याखाली गेलेली जुनी गावे, मंदिर, घरांचे अवशेष पुन्हा दिसू लागले

by Team Satara Today | published on : 07 June 2026


बामणोली : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाने तळ गाठल्याने कोयना विभागातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. लोकांना मैलोनमैलाची पायपीट करावी लागत आहे. जलाशयात बुडीत झालेल्‍या गावठाणातील घरांचे, मंदिरांचे अवशेष उघड्यावर पडले असून, नदीच्या मुख्य प्रवाहात थोडेफार पाणी उरले असून, १०५ गावांतील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः बामणोली, तापोळा आणि शेंबडी परिसरातील बोट वाहतूक पूर्णपणे बंद आहे. बोटी उघड्यावर पडल्या आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटन व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी इतकी आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरते त्या काळात हा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला दिसतो. हिरवाईने नटलेले डोंगर, विस्तीर्ण जलाशय आणि बोटींची वर्दळ यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन फुलते. मात्र दर वर्षी एप्रिल- मे महिन्यांत पाण्याची पातळी घटू लागल्यानंतर शिवसागर जलाशयाचे चित्र पूर्णपणे बदलते. पाणी आटल्याने परिसर ओसाड दिसू लागतो. या भागातील अनेक कुटुंबांचा

उदरनिर्वाह पर्यटन आणि बोट व्यवसायावर अवलंबून आहे. बोट वाहतूक बंद झाल्याने त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला आहे, तसेच कांदाटी खोरे, सोळशी खोरे, खरोशी-रेणोशी खोरे या दुर्गम भागांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी जलमार्गाने सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी आता नागरिकांना मैलोनमैल पायपीट करून बामणोली किंवा तापोळा बाजारपेठ गाठावी लागत आहे. त्यानंतर सातारा किंवा महाबळेश्वरकडे पुढील प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

 गावांतील नागरिक आपल्या जुन्या गावांना भेटी देत आहेत

जलाशयातील पाणी पातळी घटल्याने अनेक वर्षांपासून पाण्याखाली गेलेली जुनी गावे, घरांचे अवशेष तसेच मंदिरांचे भग्नावशेष पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे परिसरात पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरिक आपल्या जुन्या गावांना भेटी देत आहेत. अनेक जण आपल्या पूर्वीच्या घरांचे अवशेष आणि मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशीळच्या अस्मिता जाधवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी थेट संवाद व सहभोजनाची संधी; साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुढील बातमी
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा इशारा

संबंधित बातम्या