जिल्ह्यातील चक्री बंद करा हो ऽ ऽ ऽ जनसामान्यांचे थेट देवा भाऊंसह दोन उपमुख्यमंत्र्यांना साकडे

साताऱ्यातील चक्री जुगाराचे लोण फलटणपर्यंत; जुगार खेळणाऱ्यांमध्ये माणसह बारामतीतील युवकांची गर्दी

by Team Satara Today | published on : 23 October 2025


सातारा :  राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या फलटण शहरात सातारा शहरातील चक्री जुगार व्यावसायिकांचे लोण पसरले असून, फलटण तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या माण, बारामती तालुक्यातील दर्दी युवक फलटण शहरामध्ये चक्री जुगार खेळण्यासाठी सकाळ सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. चक्री जुगाराच्या माध्यमातून फलटण शहरात प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असून या अनधिकृत व्यवसायामुळे फलटण तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री तथा  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. २६ ऑक्टोंबर रोजी फलटण दौऱ्यावर येत असून  चक्री बंद करा हो sss तालुक्यातील जनसामान्यांचे थेट देवा भाऊंसह दोन उपमुख्यमंत्र्यांना साकडे नागरिकांनी घातले आहे. 

सातारा शहर व परिसरात फार मोठ्या प्रमाणावर चक्री जुगार व्यवसायाचे लोन पसरले असून या व्यवसायाला बळी पडून अनेक जणांनी आपल्या संसाराची ऐन दिवाळीत राखरांगोळी केली आहे. या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्यास प्रतिमहिना १० लाख रुपयांची बिदागी पोहोचवली जात असल्याच्या चर्चा सुरू असताना फलटण शहरासह फलटण तसेच शेजारील माण, बारामती तालुक्यातून फार मोठ्या प्रमाणावर दर्दी युवक भल्या सकाळीच फलटण शहरामध्ये चक्री जुगार खेळण्यासाठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

फलटण शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिंती नाका, एसटी बसस्थानक परिसर, महात्मा फुले चौक (खजिना हौद) या परिसरात चक्री जुगार व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर सुरू असून ही ठिकाणे फलटण शहरातील 'हॉटस्पॉट' ठरली आहेत. या अनधिकृत व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर हप्ते पोहचवले जात असल्याच्या चर्चा शहरातील वेगवेगळ्या चौकात खुलेआम झडत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीसह राजकीय पार्श्वभूमी असलेल्या पंटराचा फार मोठा सहभाग असल्याचे सांगितले जात असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना हाताशी धरून चक्री जुगार दिवसेंदिवस फलटण शहरात आपले हातपाय पसरू लागला आहे. विशेष म्हणजे हे लोन केवळ फलटण शहरापुरते मर्यादित न राहता शेजारील माण, बारामती तालुक्यापर्यंत पोहोचले असून तेथील दर्दी युवक फलटण शहरामध्ये भल्या सकाळीच चक्री जुगार खेळण्यासाठी दाखल होत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून फलटण शहरात चक्री जुगाराचे पैसे देण्या-घेण्यावरून हाणामारीच्या घटना घडत आहेत. मात्र 'फुकटची लक्ष्मी प्रसन्न' झालेले फलटण शहर पोलीस ठाण्याचे कारभारी 'तेरी भी चुप... मेरी भी चुप' असे म्हणत अशा प्रकारच्या हाणामारीच्या घटना बाहेरच्या बाहेर मिटवून टाकण्यात धन्यता मानत आहेत.

जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून औद्योगिक वसाहतीची वाणवा, नवीन उद्योग समूह जिल्ह्यात येण्यासाठी अनुत्सुक असल्याने रोजगाराअभावी बेकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या बेकार तरुणांना हेरून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला देशोधडीला लावण्याचे काम चक्री जुगाराच्या माध्यमातून सुरू असतानाही फलटण शहर पोलिसांनी अशा अनेक चक्री जुगार व्यवसायिकांना 'बाय' दिल्यामुळे भविष्यकाळात फलटण शहर 'अवैद्य धंद्याचे आगार' बनल्यास त्याबाबत आश्चर्य वाटायला नको.

आला दसरा, दिवाळी..‌. फोडा सुपारी सुपारी !

फलटण शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची बदली झाल्यानंतर शहरातील काही फळकुटांनी त्या संदर्भात आसुरी आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी हेमंतकुमार शहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, हेमंतकुमार शहा यांच्या बदलीनंतर आता तरी फलटण शहरातील अवैद्य व्यवसाय मोडीत निघतील, बंद होतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच आला दसरा, दिवाळी..‌. फोडा सुपारी ! असे म्हणत पहिल्यापेक्षा दुपटीने रेट काढून नवीन कारभाऱ्याने चक्री जुगार व्यवसाय बळकट करण्याला चांगलाच हातभार लावल्यामुळे फलटणच्या संस्कृतीला गालबोट लागत आहे.

देवाभाऊ, एकनाथराव, दादा तुम्ही लक्ष घालाच...

महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस जरी नागपूरचे असले तरी त्यांचे सातारा जिल्ह्यावर असलेले प्रेम अनेकदा अधोरेखित झाले आहे. दुसरीकडे सातारा जिल्ह्याशी थेट कनेक्शन असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव महाबळेश्वर तालुक्यात आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावकी नांदवळ, ता. कोरेगाव येथे आहे. आता या तिघांचा सातारा जिल्ह्याशी एवढा 'याराना' असताना, पोलिसांनी मात्र या तिघांचे नाव मातीत मिसळले आहे. असा आरोप सातारा जिल्ह्यातील चक्री जुगार पीडित लोक करीत आहेत. फलटण पोलिसांनी हप्ते खाऊन तेच हात पार्श्वभागाला पुसल्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यात वेगाने हातपाय पसरणाऱ्या चक्री जुगार व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी लक्ष घालावे अशी अपेक्षा फलटण तालुक्यातील नागरिक व्यक्त करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिल्लीत प्रदूषणाचा कहर तर साताऱ्यात मात्र शुद्ध हवेची लहर
पुढील बातमी
दिवाळी झाली, भाऊबीजेलाही नाही; लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी कधी ?

संबंधित बातम्या