पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघातांचा सापळा; आ. डॉ. अतुल भोसले यांची विधानसभेत लक्षवेधी; 100 अपघातात 54 नागरिकांचा गेला जीव

by Team Satara Today | published on : 14 December 2025


कराड : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कराड परिसरातील रखडलेल्या सहापदरीकरणाच्या कामाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडत शासनाचे लक्ष वेधले.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र कराड येथील पंकज हॉटेलपासून नांदलापूरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या अर्धवट अवस्थेतील पुलामुळे आतापर्यंत 100 हून अधिक अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये सुमारे 54 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे हा महामार्ग अक्षरशः अपघातांचा सापळा ठरत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

या महामार्गावर अलीकडेच घडलेल्या एका गंभीर अपघाताचा उल्लेख करताना आमदार डॉ. भोसले यांनी सांगितले, पिंपळगाव येथील एका कॉलेजची बस सहलीसाठी कणकवलीला गेली होती. परतीच्या प्रवासात कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ या बसचा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कृष्णा हॉस्पिटलची संपूर्ण वैद्यकीय टीम तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. बसमध्ये 40 विद्यार्थी होते. त्यापैकी 6 विद्यार्थ्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले, तर त्यातील 2 विद्यार्थ्यांची प्रकृती अतिगंभीर होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र महामार्गावरील असुरक्षिततेचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले, असे त्यांनी नमूद केले.

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना थेट प्रश्न विचारला की, या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची नेमकी डेडलाईन काय आहे? यापूर्वी सभागृहात ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही पुलाचे काम अपूर्ण आहे. पुलाचे 83 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साईटवर कामगार नाहीत, प्रोजेक्ट इन्चार्ज उपलब्ध नाही आणि सर्विस रोडच्या दुरुस्तीचे काम कधी होणार, याची कोणतीही निश्चित वेळमर्यादा नाही. सर्विस रोडच्या खराब अवस्थेमुळेही मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


याशिवाय, वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या आणि वारंवार सूचना देऊनही दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामार्फत काय कारवाई होणार, याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, सातारा-कागल या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सुरू असून, सध्या ते प्रगतीपथावर आहे. काही ठेकेदारांकडून दिरंगाई झाली असल्याचे मान्य करत, या संदर्भात केंद्र सरकारशी आधीच पत्रव्यवहार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अपघाताच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सिमेंटचे बॅरिकेड्स लावण्यात आले होते. बस चालकाच्या माहितीनुसार कुत्रा आडवा आल्यामुळे वाहनावरील ताबा सुटून अपघात झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी महामार्गावरील सुरक्षेच्या सर्व बाबी पुन्हा एकदा तपासण्याचे निर्देश नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. कराड येथील मोठ्या उड्डाणपुलाचे काम सध्या 83 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी सभागृहात दिले. नुकतीच दिल्ली येथे ना. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून, या महामार्गावरील काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांना 15 दिवसांचा अंतिम कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत समाधानकारक प्रगती न झाल्यास कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असेही ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.


 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मत्त्यापूर येथील बरड शिवारात बिबट्याला भयंकर पद्धतीने संपवले; चारही पंजे तोडले, 18 नखे गायब, शिकारीच्या घटनांबाबत तीव्र नाराजी
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील धनवडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; लोक बिबट्याच्या दहशतीखाली

संबंधित बातम्या