ए.आय. टेक्नॉलॉजीमळे बळीराजाच्या जीवनात आर्थिक उन्नती होणार

मंत्री मकरंद पाटील : 'किसन वीर' कारखान्यावरील शेतकरी मेळाव्यास उत्फुर्त सहभाग

by Team Satara Today | published on : 19 August 2025


भुईंज : ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त शेतकन्यांनी ए. आय. टेक्नॉलॉजीचा वापर करून याबाबत तज्ञांमार्फत माहिती अवगत केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे. सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून त्याप्रमाणे शेती केल्यास ती फायदेशीर ठरणारी आहे. शेतकऱ्यांनीही स्पर्धेच्या युगात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपल्या जीवनात आर्थिक उन्नती होणार असल्याची खात्री, राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री व किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांनी दिली.

आंतराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ अंतर्गत, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (ए.आय.) तंत्ज्ञानाचा वापराबाबत कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

नामदार पाटील पुढे म्हणाले, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (ए.आय.) तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चार ते पाच वर्षापुर्वींची संकल्पना मांडलेली होती. या संकल्पनेला आता मुहूर्तस्वरुप आलेले असून शेतकऱ्यांनीही शेतीसाठी आधुनिकतेचा वापर केला पाहिजे. ए.आय. टेक्नॉलॉजीमुळे ऊस पिकाला आवश्यक असणारी माहिती खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे शेतीतील अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादन वाढले जाते. शेतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांने या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतशील शेतकरी होणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानामळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्यांची वाढ होणार असल्याचे सांगितले. येणाऱ्या गळित हंगामासाठी कारखान्याने आवश्यक असणारी तोडणी यंत्रणा भरलेली असुन आपली संस्था टिकवायची असेल व सर्वाना आर्थिक स्थैर्य प्राप्त करावयाचे असेल तर आपण पिकविलेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गाळपासाठी देण्याचे आवाहन करून नुकतेच कारखान्याला दोन पुरस्कार मिळालेले असून नजिकच्या काळात इतर कारखान्यांच्या दराप्रमाणे सर्वोत्तम दरही देण्यास किसन वीर मागे पडणार नसल्याचे सुतोवाच नामदार पाटील यांनी दिले.

बारामती येथील ए., आय. विभागाचे प्रमुख तुषार जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (ए.आय.) तंत्रज्ञानाद्वारे ऊसाची उत्पादन क्षमता कशा पद्धतीने वाढविण्यास मदत करते याचे चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी ए.आय. द्वारे व नेहमीची ऊस लागवड याबाबतची तीन, सहा महिन्यांमध्ये झालेली तफावत उपस्थितांना दाखविली. हे तंत्रज्ञान सध्या संपुर्ण जगामध्ये सुरू असून ऊस शेतीमध्ये याचा वापर आता सुरू झालेला आहे. भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान ऊस शेतीसाठी महत्वाचे ठरणार आहे. ऊसासाठी कधी व कोणत्यावेळी अन्नघटक व पाण्याची आवश्यकता, हवामानाची माहिती तसेच भौतिक केमिकल व जैविक गुणधर्माचा अभ्यासाची माहिती मोबाईलद्वारे शेतकऱ्यांना मिळणार आहे. या तंत्रज्ञानामुळे ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढ मिळत असून ऊसाच्या रिकव्हरीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे ए.आय. तंत्रज्ञान आजच्या युगाची गरज बनलेली असल्याची माहिती श्री. जाधव यांनी दिली.

ए. ए. सुखसे यांनी आपल्या मार्गदर्शनात ए.आय. तंत्रज्ञान हे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीमध्ये कशाप्रकारे कार्य करते याबाबत शेतकऱ्यांना सूचित केले. रासायनिक खतांचा अतिरिक्त पुरवठा व सेंद्रिय खतांचा कमी वापर यामुळे शेतीची सुपिकता खालवत चाललेली असल्याचे सांगितले. यावरच्या उपाययोजना उपस्थितांना सांगितल्या. ए. बी. सुशिल यांनी ए.आय. तंत्रज्ञान कशा पद्धतीने बसविण्यात येते व त्याचा खर्च व त्यामध्ये शेतकरी, कारखाना, व्हीएसआय यांचे किती योगदान देणार असून याबाबतची सर्व माहिती व योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कारखान्यातील शेती ऑफिसमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले.

प्रमोद शिंदे यांनी कमी शेतीत जास्ती उत्पादन घेतल्याशिवाय पर्याय नसुन यासाठी शेतकऱ्यांनी ए.आय. तंत्रज्ञानाद्वारे शेती करणे गरजेच असल्याचे सांगितले. शेतकरी मेळाव्या घेण्याबात नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांनी सुचित केल्यानसार कमी वेळेत पण नेटके आयोजन करण्यात आले असून यामागील उद्दिष्ठ म्हणजे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे सांगितले.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितंद्र रणवरे,खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, दत्तानाना ढमाळ, संपतराव शिंदे, आत्माराम सोनावणे, बी. के. पवार, अशोक सस्ते, रामभाऊ ढेकळे, मनिष भंडारी, भैय्या डोंगरे, चरण गायकवाड, यशवंत जमदाडे, ज्ञानदेव शिंगटे, शामराव गायकवाड, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, पोपट जगताप, शशिकांत पवार, नितीन निकम, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड तालुक्यातील प्राथमिक शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर
पुढील बातमी
सातारमध्ये आंदोलने डे..!

संबंधित बातम्या