सातारा : एच. आय. व्ही संसर्गितांना सन्मानाची वागणूक देणे ही प्रत्येक समाजातील घटकांची जबाबदारी असून त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये यासाठी कायदा अस्तित्वात आला आहे. एच.आय. व्ही संसर्गितांच्या संबंधित तक्रारी व खटले लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती सातारा येथील जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा सचिव नीना बेदरकर यांनी दिली.
जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, वैद्यकीय अधिकारी राहुल जाधव, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. कुर्हाडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सरला पुंड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, युवकांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने व योग्यरित्या शास्त्रीय माहीती मिळविण्यासाठी करावा. अशास्त्रीय माहीती युवकांनी घेऊ नये किंवा अविचाराने इतरांनाही पाठवू नये.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी एकजुटीने एचआयव्हीशी लढा देऊ, नव परिवर्तन घडवू असल्याचे सांगितले. जिल्हा एड्स नियंत्रण विभाग मार्फत 117 महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला आहे. जनजागृती व्याख्याने, पथनाट्य, लोककला, फ्लॅश माँब, प्रश्नमंजुषा, विविध स्पर्धा उपक्रम या क्लबच्या माध्यमातून राबविले जात आहेत. यावेळी उल्लेखनीय कार्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. या रॅलीमध्ये सातारा शहर व परिसरातील व 20 महाविद्यालयातील 1500 युवक-युवतींसह जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, एड्स नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व प्रकल्प कर्मचार्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन हेमंत भोसले यानी केले.