मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींच्या जल्लोषात साजरा

रविंद्रभैय्या ढोणे यांच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 30 March 2025


सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करीत मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींनी जल्लोषात साजरा केला.

आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बांधकाम मंत्री झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस. त्यामुळे सातारकरांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र सातारा शहरात दिसून येत आहे. त्यातच श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले रविंद्रभैय्या ढोणे यांच्या संकल्पनेतून समाजातील महिलावर्गाला काहीतरी आपण देणे लागतो, तसेच समाजाप्रती उत्तरदायित्व म्हणून लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.

30 मार्च रोजी शिवेंद्रसिंहराजे आपल्या वाढदिनाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असणार, आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्याचा विचार करुन रविंद्रभैय्या ढोणे आणि त्यांच्या मित्रसमूहाने 29 मार्चच्या मध्यरात्री लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या लकी ड्रॉ मध्ये 777 साड्या, इस्त्री, कुकर, 11 पैठणी साड्या, स्मार्ट वॉच, एअर बड्स, सोन्याची नथ, मिक्सर, गॅस शेगडी, आटा चक्की, फ्रिज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरिफायर, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, सोन्याची कर्णफुले आणि सोन्याचा नेकलेस अशा महागड्या वस्तूंची रेलचेल होती. त्यामुळे साहजिकच ढोणे यांच्या कार्यक्रमास शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. यामध्ये सातारा शहरासह बाहेरील महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम अत्यंत पारदर्शीपणे पार पडला. कार्यक्रमात मुली-महिलावर्गाने गाण्यांवर ठेका धरुन नाचत आणखीनच कार्यक्रम खुलवला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने लाखो रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली.

यावेळी बोलताना ढोणे म्हणाले, समाजकारणाचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. वडिलांकडूनच मी समाजाचेही काही देणे लागतो, हे शिकलो. प्रभागात फिरत असताना संपूर्ण प्रभाग हा माझा आहे, माझ्याच घरातील लोक आहेत, याच भावनेतून मी लोकांच्या अडी-अडचणीमध्ये मदत करीत असतो. आमचे दैवत हे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा लकी ड्रॉ चा कार्यक्रम आपल्या प्रभागात करता आला, याबाबत मी स्वत:स धन्य मानतो.

यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, रविंद्रभैय्या ढोणे यांना मी कधीच कार्यकर्ता म्हणून मानले नाही, ते माझे जवळचे मित्रच आहेत. माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम रवीभैय्या दरवर्षीच भरवत असतात. या कार्यक्रमास माता-भगिनींचा नेहमीच जोरदार प्रतिसाद मिळत असतो. या प्रतिसादावरुनच माता-भगिनींचे रविंद्रभैय्या ढोणे यांच्यावरील प्रेम दिसून येते. तुमच्याच पाठिंब्याने मी आमदार झालो, त्यानंतर मंत्री झालो. मात्र, मी मंत्री महाराष्ट्राचा आहे. सातार्‍यात आल्यानंतर मी तुमचाच बाबा अगर बाबाराजे आहे, हे विसरु नका.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी महिलांसह कार्यकर्त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या गगनभेदी घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे अतीशय रेखीव आयोजन गजेंद्र, देवेंद्र, विरेंद्र, किरण ढोणे, विजय देशमुख, नरेश जांभळे आणि रविंद्रभैय्या ढोणे मित्र समूहाकडून करण्यात आले होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सूर्यनारायणाच्या साक्षीने मराठी नवीन वर्षाचे 'असेही' स्वागत!
पुढील बातमी
अपघात प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या