साताऱ्यात महाराष्ट्र दिनासोबत ‘गुलमोहर दिन’ उत्साहात; निसर्ग, कला आणि पर्यावरणप्रेमाचा अनोखा संगम

by Team Satara Today | published on : 02 May 2026


सातारा : महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने सातारा शहरात ‘गुलमोहर दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेली तब्बल २८ वर्षे साताऱ्यात, विशेषतः चर्च परिसरात, ही आगळीवेगळी परंपरा जपली जात असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला बहरणाऱ्या गुलमोहराच्या लालचुटूक फुलांनी सजलेल्या रस्त्यांमध्ये नागरिकांनी या दिवसाचे स्वागत केले. निसर्गप्रेमी, कलाकार, छायाचित्रकार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत गुलमोहराच्या सौंदर्याचा आनंद घेताना दिसले.

या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कविता वाचन, निसर्ग छायाचित्रण स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन अशा कार्यक्रमांमुळे वातावरण अधिक रंगतदार झाले. विशेषतः तरुणाईने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत या उपक्रमांना प्रतिसाद दिला. गुलमोहर दिन’ केवळ सौंदर्याचा उत्सव नसून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारा उपक्रम ठरतो. शहरातील वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे महत्त्व आणि निसर्गाशी नाते जपण्याची गरज याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात या दिवसाची मोठी भूमिका आहे.

साताऱ्याचा ‘गुलमोहर दिन’ हा महाराष्ट्र दिनासोबत साजरा होणारा एक अनोखा आणि प्रेरणादायी उत्सव ठरला असून, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी नागरिक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.

कलाकार, कवी, कवयित्री, चित्रकर्मी यांचा मोठा मेळावा

अमेरिकन चर्च परिसरामध्ये हौशी कलाकार, कवी, कवयित्री, चित्रकर्मी यांचा मोठा मेळावा भरला होता. विविध कार्यक्रम साजरे होत असताना साताऱ्यात मात्र रंगांचा वेगळा महोत्सव या निमित्ताने पाहायला मिळाला. त्रिदशकाकडे वाटचाल करणाऱ्या गुलमोहर महोत्सवात गुलमोहराच्या भावना व्यक्त करणाऱ्या अनेक कविता सादर झाल्या तसेच गुलमोहराच्या रंगछटा दर्शनाली वेगवेगळी चित्रे प्रदर्शित झाली. चर्च परिसरातील अनेक गुलमोहर तसेच इतर झाडांच्या फांद्यांवर वेगवेगळ्या भावविश्वाची रंगीबेरंगी छायाचित्रे लटकवण्यात आली होती. तसेच म्युरल्स बनवणाऱ्या काही कलाकारांनी या मेळाव्यात भाग घेतला होता .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नसरापूर अत्याचार प्रकरण: पीडितेच्या नातेवाईकांचा नवले पुलावर ठिय्या, पुणे-बंगळुरू महामार्ग रोखला
पुढील बातमी
जिल्ह्यात उसाचे पैसे थकीतच; ९ मे रोजी ना. नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकर गोडसे यांचा इशारा

संबंधित बातम्या