सातारा : सातारा जिल्ह्यातील चित्रपट कलावंत, छायाचित्रकार, ज्युनिअर आर्टिस्ट तसेच विविध क्षेत्रातील तंत्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे चित्रपटसृष्टी उभारण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष तथा समर्थ पॅनलचे मुख्य संचालक व अध्यक्षपदाचे उमेदवार मेघराज राजेभोसले यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातार्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांतील सभासदांचे मतदान 7 जून रोजी होणार असून समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी यावेळी आपली भूमिका मांडली.
यावेळी निर्माता सुनील महाजन, दीपक कदम, दिग्दर्शक अजित शिरोळे, लेखक राज काझी, अभिनेते सुशांत शेलार, छायाचित्रकार धनाजी यमकर, दिग्दर्शक सुभाष नकाशे, ध्वनी संयोजक शरद चव्हाण, कला दिग्दर्शक प्रवीण (वासू) पाटील, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, निर्माता व्यवस्थापक रवी गावडे, प्रसिद्धी प्रमुख गणेश गारगोटे तसेच पी. वाय. कोळी, दीपक देशमुख आणि कामगार प्रतिनिधी विकास तोरणे उपस्थित होते.
मेघराज राजे भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्याला कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता आणि दिग्दर्शकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. अण्णा देशपांडे, दिग्दर्शक दीपक देशमुख आणि दिवंगत चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांसारख्या मान्यवरांनी या जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत उंचावले आहे. त्यामुळे सातार्यातील कलावंतांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
सातारा जिल्ह्यात चित्रपट महामंडळाचे सुमारे 2200 हून अधिक सभासद असून अ वर्गातील 115 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. समर्थ पॅनलच्या पतंग चिन्हासमोर मतदान करून पॅनलला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पुढील पाच वर्षांसाठीचा अजेंडा स्पष्ट करताना भोसले म्हणाले की, सातारा जिल्ह्यात सक्रिय सभासद संख्या वाढवणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, त्यांच्या पेन्शन व मानधनासंदर्भातील मागण्या शासनापर्यंत पोहोचवणे तसेच जिल्ह्यात चित्रपटनिर्मितीला चालना देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, यावर भर दिला जाईल.
सातारा जिल्ह्यातील कलावंतांचे कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ पॅनल कटिबद्ध असून पॅनल प्रमुख म्हणून मी स्वतः त्यासाठी बांधील आहे, असेही मेघराज राजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.