सातारा : शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेने कारवायांचा धडाका लावला आहे. आज दि. 17 रोजी दिवसभरात शहरातील एसटी स्टँड, राजवाडा, समर्थ मंदिर आणि मंगळवार तळे या प्रमुख ठिकाणी अचानक नाकाबंदी करून बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण 63 केसेस दाखल करून 34 हजार 500 रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रामुख्याने रिक्षाचालकांकडून गणवेश नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा चालकांविरुद्ध विशेष कारवाई करण्यात आली. याशिवाय दोन चारचाकी वाहनांना लावण्यात आलेली नियमबाह्य ब्लॅक फिल्मिंग हटवून संबंधित वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी आहेत. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, प्रवाशांची सुरक्षितता जपणे तसेच वाहनांची कागदपत्रे व आवश्यक परवानग्या अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांविरुद्ध यापुढेही सातत्याने कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे सातारा शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी स्पष्ट केले आहे.
याचबरोबर वाहतूक शिस्त ही सामूहिक जबाबदारी आहे. दंडात्मक कारवाईची वेळ येण्यापूर्वीच प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे पालन करणे, हाच या मोहिमेचा महत्त्वाचा संदेश आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन राजेश माने यांनी केले आहे.
बेशिस्त रिक्षाचालकांना वाहतूक शाखेचा दणका; एका दिवसात 63 केसेस, 34 हजार 500 रुपयांच्या दंडाची आकारणी
गणवेश नियमांचे उल्लंघन करणार्यांवर विशेष कारवाई; दोन चारचाकींची ब्लॅक फिल्मिंगही हटवली
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा