सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढा आमदार रोहित पवार यांच्यासमोर वाचला; आरोग्य केंद्र, वसतिगृह आणि मानधनावर संताप

by Team Satara Today | published on : 27 July 2026


पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्य केंद्रात सर्व आजारांसाठी एकच गोळी दिली जाते. विद्यार्थी सायंकाळी आरोग्य केंद्रात गेल्यास त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. विद्यार्थ्यांना कमवा व शिका या योजनेअंतर्गत अद्याप वाढीव मानधन दिले गेले नाही, बार्टी, सारथी, महाज्योती यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये असमानता आहे, अशा अनेक समस्यांचा पाढा रविवारी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आमदार रोहित पवार यांच्यासमोर वाचला.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जल्लोषाच्या कार्यक्रमानिमित्त रोहित पवार यांनी विद्यापीठात भेट दिली. यावेळी विद्यापीठातील जयकर ग्रंथालयासमोर विद्यार्थ्यांशी संवाद साधत रोहित पवार यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

विद्यार्थी म्हणाले, विद्यापीठात वसतिगृहाची अडचण असून, विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. दोन वेळच्या जेवणाला पुरतील एवढे पैसेसुद्धा कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.

त्यामुळे मानधनात वाढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याबाबत आपण प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर रोहित पवार यांनी मनमोकळ्या पद्धतीने संवाद साधला. स्टेनोग्राफर भरतीमधील बदल, रस्त्याच्या कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, अहिल्‍यानगर जिल्हा बँकेतील पदभरतीमधील गैरप्रकार यावर रोहित पवार यांनी स्पष्टपणे भाष्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर–कुंभरोशी मार्गावरील आंबेनळी घाटात सलग तिसऱ्यांदा दरड कोसळली, काही काळ वाहतुकीत अडथळा

संबंधित बातम्या