सातारा : सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील तसेच ऑल इंडिया ड्युटी मेट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळालेला सूर्या या श्वानाचा (डॉग) मंगळवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. शासकीय इतमामात मानवंदना देऊन त्याला अखेरची मानवंदना देण्यात आली.
मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास डॉग सूर्याला त्याचे हॅन्डलर (सांभाळ करणारे पोलिस) पोलिस सागर गोगावले व नीलेश दयाळ यांनी त्याचे जेवण (पेडीग्री खाद्य) तयार केले होते. त्याचवेळी सूर्या डॉग कळवळला व कोसळला. अचानक डॉग पडल्याने दोन्ही हॅन्डलरनी त्याला काय झाले हे पाहिले. डॉग बेशुद्ध अवस्थेत गेल्याने त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक उपचार दिले. मात्र तरीही सूर्या डॉगने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सूर्याला पशु वैद्यकीय अधिकार्यांना दाखवले असता त्यांनी मृत्यू झाला असल्याचे सांगितले. प्राथमिक स्वरुपात हृदयविकाराचा झटका आला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबतची माहिती पोलिस अधिकार्यांना देण्यात आले. सूर्या डॉगचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याला शिरवळ येथे नेण्यात आले. दुपारी 4 वाजता शवविच्छेदन करुन पोलिस मुख्यालयात सूर्याला आणण्यात आले. यावेळी सूर्याला पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी मानवंदना दिली. याशिवाय उपस्थित असलेल्या शेकडो पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी मानवंदना देऊन पुष्प अर्पण केले. यावेळी शासकीय इतमामात मानवंदना दिल्यानंतर म्हसवे येथील बेटावर सांयकाळी उशिरा सूर्या डॉगवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सूर्या श्वान मंगळवारी सकाळपर्यंत ठणठणीत होता. सोमवारी वीर धरणासह इतर अनेक ठिकाणी हॅन्डलरसोबत कर्तव्य (ड्युटी) बजावल्याचेही समोर आले आहे. सकाळपर्यंत ठणठणीत असणार्या सूर्याला असे काही होईल याचा कसलाही अंदाज पोलिसांना आला नाही. दरम्यान, पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी सर्व श्वानांचे चेकअप करण्याच्या सूचना केल्या आहेत.
सूर्या हा लॅब्रोडोर जातीचा श्वान होता. अवघ्या 45 दिवसांचा असताना पुणे येथून त्याला सातारा पोलिस दलात ड्युटी करण्यासाठी आणला. बॉम्ब शोधक पथकासाठी तो कर्तव्य बजावत होता. गेली आठ वर्षे त्याने सातारा पोलिस दलाची सेवा केली. अजून दोन वर्षे सेवा असतानाच 8 व्या वर्षी त्याचे निधन झाले.
सूर्याची कामगिरी
2017 मध्ये चंदीगड येथे सुवर्ण पदक
2023 मध्ये पुणे ग्रामीण येथे रौप्य पदक
2024 मध्ये कोल्हापूर रेंजमध्ये रौप्य पदक
2024 महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात रौप्य
2025 मध्ये ऑल इंडिया ड्युटी मेट झारखंड येथे सुवर्ण