सातारा : सोशल मीडियावर सातारा जिल्हा पोलीस दलाबाबत दिशाभूल करणारी, खोटी व बनावट माहिती प्रसारित केल्याप्रकरणी इन्स्टाग्रामवरील एका अज्ञात खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, पोलीस दलाकडून सोशल मीडियाची नियमित पाहणी सुरू असताना एका खात्यावरुन त्याच्या वापरकर्त्याने स्वत:ची ओळख लपवून, कोणतीही खातरजमा न करता एक व्हिडीओ लिंक इन्स्टाग्रामवर प्रसारित केली. या व्हिडीओमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाबाबत चुकीची माहिती सांगण्यात आली असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनावट ऑडिओ-व्हिडीओ व फोटो वापरून वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला होता. त्या पोस्टवरील मजकुराच्या माध्यमातून पोलिसांविरोधात असभ्य भाषा वापरण्यात आली होती.
तसेच, पोलिसांची बदनामी करणे, त्यांची प्रतिमा मलिन करणे तसेच समाजात पोलिसांविषयी अप्रितीची भावना निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसल्याने संबंधित अज्ञात खातेधारकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिस या घटनेचा पुढील अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.