सातारा : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मांडलेल्या विविध मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित विभागांना आवश्यक त्या तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सातारा नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्पष्ट केले आहे. समितीच्या मागणीनुसार आज दुपारी 4 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून, सातारा शहरातील विविध गणेश मंडळांकडून उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मंडप उभारणी, विसर्जन मिरवणुका, भाविकांची सुरक्षितता तसेच आवश्यक पायाभूत सुविधांसाठी प्रशासनाने विशेष नियोजन करावे, अशी मागणी समितीने केली आहे.
गणेश मंडळांना नगरपरिषद, पोलीस, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, महावितरण आदी विविध विभागांकडून परवानग्या घ्याव्या लागतात. मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी एक खिडकी योजना’ सुरू करण्याची प्रमुख मागणी समितीने केली आहे.
याशिवाय मोती चौक परिसरातील कॅमेर्यांची दुरुस्ती, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी, लटकणार्या केबल व विद्युत तारांची योग्य उंची करणे तसेच मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
विसर्जन तलावांची स्वच्छता, दुरुस्ती व नियमित देखभाल, विसर्जन घाटांवर प्रकाशव्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्याची मागणी समितीने केली आहे. माहुली येथे विसर्जन व्यवस्थेचे नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गणेशमूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीसाठी गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसापासून क्रेनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळांसाठी सुंदर गणेशमूर्ती’ व सुंदर देखावे’ स्पर्धा आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत राजवाडा चौपाटीची वेळ रात्री 2 वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक परवानग्या सुलभ करण्याची मागणीही समितीने केली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव हा सातारा शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याने, नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. या तरतुदीच्या माध्यमातून उत्सव काळातील स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, विसर्जन व्यवस्था, पाणीपुरवठा, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच इतर सार्वजनिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव काळात मंडळांवर आकारण्यात येणार्या जाहिरात करात कपात अथवा करमाफी देण्याची मागणीही समितीने केली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावर आवश्यक परवानग्या व विविध विभागांच्या समन्वयासाठी समिती पाठपुरावा करणार आहे.
गणेशोत्सवाचे नियोजन किमान दोन महिने आधीपासून सुरू करून नगरपरिषद, पोलीस, वाहतूक, अग्निशमन, महावितरण व इतर संबंधित विभागांचा समन्वय साधावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी समितीच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्याने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आज दुपारी 4 वाजता होणार्या विशेष बैठकीत गणेशोत्सवासाठी करण्यात येणार्या विशेष तरतुदी, सुविधा आणि विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजीत बारटक्के, कार्याध्यक्ष चंद्रशेखर घोडके, सचिव अक्षय गवळी सावकार, मुन्ना बागवान, सुजित परदेशी, अजिंक्य गुजर, पप्पू इंगवले, पंकज चव्हाण, नगरसेवक विश्वतेज बालुगडे, हर्षल चिकणे आदी उपस्थित होते.
गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद करण्याची ग्वाही
by Team Satara Today | published on : 01 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा