सातारा : व्यंकटपुरा पेठ परिसरातील एका घरातून ४३ हजार ९०० रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २० जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या कालावधीत घरातील दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये कपाटात ठेवलेली रोकड गायब झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत स्मिता दीपक भोसले (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुषमा सचिन जाधव (रा. मोरे कॉलनी, शाहूपुरी) यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार खलिफा करीत आहेत.