सातारा : कण्हेर धरणातील पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी आणखी वाढविण्यात आला. धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आल्याने वेण्णा नदीला महापूर येऊन नदीवरील किडगाव व म्हसवे येथील पूल व नदीकाठच्या काही स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. यामुळे धरण व्यवस्थापनेने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे कण्हेर धरणातील पाणीसाठा 87 टक्के झाला असून परिसरात 1 जूनपासून पावसाची नोंद 544 मिमी इतकी झाली आहे. धरणातील पाण्याची आवक 9,121 क्युसेक प्रति तास होत आहे. यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन 688.66 मीटर इतकी पाण्याची पातळी झाली आहे.
रविवारी सकाळी 9 वा. धरणाचे चारीही दरवाजे 50 मिमीने उचलून सांडव्यावरून 5,047 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे वेण्णा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे किडगाव व म्हसवे येथील पूल व नदीकाठच्या काही स्मशानभूमी पाण्याखाली गेलेल्या आहेत. यामुळे काही गावे संपर्कहिन होऊन म्हसवे मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. किडगाव व म्हसवे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी लांब पाल्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याने पादचार्यांना नाहक त्रास होत आहे. धरण परिसरात दोन दिवसात सुमारे 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तुडुंब भरून वाहत असलेल्या वेण्णा नदीमुळे काठावरील अनेक शेतीमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे धरणातील पाणी सुरू राहणार असल्याचे धरण खात्याकडून सांगण्यात आले. यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी, अशा सूचना धरण विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत.