सातारा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ८३० गावांमधील ३ हजार ८३९ पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी आधार प्रमाणीकरणासाठी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २ हजार ५९२ आणि इतर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या १ हजार २४७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही यादी गावनिहाय ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, बँक शाखा आणि उप अथवा सहाय्यक निबंधक कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ही संपूर्ण कर्जमुक्तीची यादी असून ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जथकबाकीची रक्कम माफ करण्यात येत आहे. तसेच १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्चही माफ केले जाणार आहेत. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांच्या ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ पर्यंतची थकबाकी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचे कर्जही शासनाच्या हेअर कट धोरणानुसार पूर्णपणे निरंक केले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, त्यांनी तो प्रथम काढून घ्यावा. यापूर्वीच्या यादीतील ३,१८७ प्रलंबित शेतकऱ्यांनी आणि तिसऱ्या यादीतील ३,८३९ शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील ३ हजार ८३९ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर; शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा