कराड : शिवारात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. यात महादेव गणपती पाटील (वय ५५) हे गंभीर जखमी झाले. काल , मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
महासोली ता. कराड येथील शेतकरी महादेव पाटील हे दुपारच्या सुमारास कोरवाडा या शिवारात वैरण आणण्यासाठी गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. यात त्यांच्या हाताला व छातीला जखम झाली. आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी जमा झाल्याने महादेव पाटील थोडक्यात बचावले.
त्यांना तात्काळ उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.